Hot Posts

6/recent/ticker-posts

मार्ग बदलामुळे शेतकरी संभ्रमात; शक्तीपीठ महामार्गासाठी निवेदन

 मार्ग बदलामुळे शेतकरी संभ्रमात; शक्तीपीठ महामार्गासाठी निवेदन



 

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- शक्तीपीठ महामार्गाचे आरेखन पूर्वीच्या पद्धतीनेच करण्यात यावे, या मागणीसाठी मोहोळ तहसील कार्यालयावर शक्तीपीठ महामार्ग समर्थक नागरिक व शेतकरी बांधवांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. मात्र या आंदोलनात भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांनी स्वतंत्रपणे निवेदने सादर केल्याने दोन्ही पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे चित्र दिसून आले.

शक्तीपीठ महामार्गाचे उत्तर सोलापूर-मोहोळ-पंढरपूर-सांगोला-आटपाडी असे आरेखन यापूर्वी निश्चित करण्यात आले होते. या आरेखनात मोहोळ तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. मोहोळ शहराजवळून जाणारा हा महामार्ग शहराच्या विकासाला चालना देणारा असून, मोहोळ शहर मुख्य प्रवाहाशी जोडले जाणार आहे. यासाठी शासनाच्या वतीने मोहोळ परिसरात अलाइनमेंट निश्चित करून शेतांमध्ये पोल रोवण्यात आले आहेत, झाडांची मोजणी झाली असून पाईपलाईन बांधकामासंदर्भातील कामेही एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी केली आहेत. शेतकऱ्यांना मोबदल्याबाबत माहिती देण्यात आली होती.

या प्रक्रियेमुळे मागील तीन वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी शेतीत पीक घेतले नाही, पाईपलाईन किंवा विहिरी खोदल्या नाहीत, झाडे लावली नाहीत तसेच घर बांधकामही केले नाही. काहींनी तर जमीन संपादित होणार या अपेक्षेने घर पाडले, दुसरीकडे शेत घेण्यासाठी अॅडव्हान्स दिला. मात्र अद्याप जमीन संपादन झालेले नाही. त्यातच मुख्यमंत्र्यांनी अचानक शक्तीपीठ महामार्गाच्या मार्गात बदल होणार असल्याचे संकेत दिल्याने शेतकरी वर्गात प्रचंड संभ्रम, नाराजी व हतबलता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग समर्थक व शेतकरी बांधवांनी मोर्चा काढून जुनेच आरेखन कायम ठेवण्याची मागणी केली. शिवसेना (शिंदे गट) राज्य ओबीसी प्रमुख व मोहोळचे नगरसेवक रमेश बारसकर तसेच नूतन नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना (शिंदे) नगरसेवक लखन कोळी, अतुल कुर्डे, सरफराज सय्यद, काँग्रेस किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. संग्राम चव्हाण, पद्माकर देशमुख, संग्राम चव्हाण आदी उपस्थित होते. चार दिवसांपूर्वीच या मोर्चाबाबत तहसील प्रशासनाला लेखी सूचना देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

दरम्यान, त्याच दिवशी भाजप तालुकाध्यक्ष व नूतन नगरसेवक सतीश काळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून स्वतंत्र निवेदन देण्यात आले. यावेळी अजिंक्यराणा पाटील, नगरसेवक कुंदन धोत्रे, संतोष वायचळ, आबा आंडगे तसेच भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुजीब मुजावर आदी उपस्थित होते.एकाच विषयावर दोन वेगवेगळी निवेदने सादर झाल्याने शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर राजकीय श्रेयवाद रंगत असल्याची चर्चा मोहोळमध्ये सुरू आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments