महापालिकेचा फॉर्म्युला झेडपीतही; मतदानाआधी थेट खात्यात पैसे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिका निवडणुकीप्रमाणेच आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर शेतकरी आणि लाडक्या बहिणींना आर्थिक लाभ देण्याचा फॉर्म्युला पुन्हा वापरला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान असून त्याआधी अवघ्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ४ हजार रुपये तर लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार आहेत.
महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले होते. त्याआधी १३ जानेवारीला लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपयांचा हप्ता जमा झाला होता. या निवडणुकीत लाडक्या बहिणींनी सत्ताधाऱ्यांना पसंती दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले. आता हाच पॅटर्न जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राबवला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्यात शेतकरी सन्मान निधीचे सुमारे ९० ते ९४ लाख लाभार्थी आहेत, तर ग्रामीण भागातील ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थींची संख्या सव्वाकोटीच्या आसपास आहे. शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये दर तीन महिन्यांनी मिळतात. केंद्र सरकारचा हप्ता वितरित झाल्यानंतर साधारण आठ दिवसांत राज्य सरकारकडून शेतकरी महासन्मान निधीची रक्कम जमा केली जाते.
कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, २३ जानेवारी रोजी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता देण्यात येणार असून, जानेवारीअखेर किंवा २ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे. यासाठी कृषी विभागाने वित्त विभागाकडे १,९३० कोटी रुपयांची मागणी केली आहे.
दरम्यान, लाडक्या बहिणींनाही दरमहा आर्थिक मदत दिली जाते. डिसेंबर महिन्याचा हप्ता महापालिकेच्या मतदानापूर्वीच वितरित झाला होता. आता जानेवारी महिन्याचा हप्ता १ ते ३ फेब्रुवारीदरम्यान महिलांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याचे महिला व बालकल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
१० दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार रुपये
केंद्र सरकारचा २ हजार आणि राज्य सरकारचा २ हजार असा एकूण ४ हजार रुपयांचा हप्ता अवघ्या १० दिवसांच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे झेडपी निवडणुकीआधी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लाभार्थी यादी पडताळणी पूर्ण
शासनाकडून जिल्ह्याला ४ लाख ८८ हजार शेतकरी लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली असून ती पडताळून शासनाकडे पाठविण्यात आली आहे. लवकरच लाभार्थ्यांना पुढील हप्ता मिळेल. आता तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे थंब असल्याशिवाय पोर्टल उघडत नाही, अशी नवी कार्यपद्धत लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्रचार्य भोसले यांनी दिली.
दोन्ही योजनांचे आकडे
शेतकरी सन्मान निधीचे लाभार्थी : ९४.२३ लाख
आता मिळणारी रक्कम : प्रत्येकी ४,००० रुपये
‘लाडकी बहीण’ योजनेचे लाभार्थी : १.२३ कोटी
आता मिळणारा हप्ता : प्रत्येकी १,५०० रुपये
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आर्थिक लाभांमुळे ग्रामीण भागातील वातावरण तापले असून, आगामी मतदानावर त्याचा किती परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
.png)
0 Comments