सोलापूरचे आयटी पार्क होणार वास्तवात! होटगी रोडवरील ५० एकर जागा हस्तांतरणासाठी हालचाली वेगात
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- सोलापूरच्या औद्योगिक आणि रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेला आयटी पार्क प्रकल्प अखेर प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. होटगी रोड परिसरातील जलसंपदा विभागाची ५० एकर जमीन आयटी पार्कसाठी उद्योग विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत उद्योग विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले असून, जागा विनामूल्य देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उद्योग विभागाचे प्रादेशिक अधिकारी शिवाजी राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून संबंधित जमीन उद्योग विभागाकडे हस्तांतरण करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याची विनंती केली आहे. जमीन ताब्यात आल्यानंतर एमआयडीसीमार्फत आराखडा तयार करून उद्योजकांच्या गरजेनुसार प्लॉटिंग करण्यात येणार आहे.
अभियंत्यांचे स्थलांतर थांबणार - सोलापूर शहर व जिल्ह्यात सध्या १५ अभियांत्रिकी महाविद्यालये असून, दरवर्षी सुमारे साडेसहा हजार अभियंते शिक्षण पूर्ण करतात. मात्र अपेक्षित रोजगार उपलब्ध नसल्याने साडेचार ते पाच हजार अभियंते दरवर्षी पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद व बंगळुरूकडे स्थलांतरित होत आहेत.आयटी पार्क उभारल्यानंतर स्थानिक पातळीवरच रोजगारनिर्मिती होऊन हे स्थलांतर कायमचे थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राजकीय पातळीवर पाठबळ - या प्रकल्पासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. देवेंद्र कोठे, सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह सर्व आमदार प्रयत्नशील असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सुरुवातीपासून या प्रकल्पाकडे लक्ष दिले आहे.
जमीन विनामूल्य की रेडीरेकनर दराने?
होटगी रोड परिसरातील ही जमीन सध्या जलसंपदा विभागाच्या मालकीची आहे.रेडीरेकनर दरानुसार जमीन देण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाचा असला, तरी उद्योग विभागाने ती जागा विनामूल्य घेण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावरचा अंतिम निर्णय जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील नियामक मंडळात घेतला जाणार असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जमीन विनामूल्यच मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
२० ते २२ महिन्यांत आयटी पार्क - जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उद्योग विभागाकडून पुढील कार्यवाही सुरू होईल. अंदाजे पुढील २० ते २२ महिन्यांत आयटी पार्क उभारला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
“आयटी पार्कसाठी जलसंपदा विभागाची जमीन उद्योग विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवले आहे. हस्तांतरणानंतर आराखडा तयार करून उद्योजकांच्या गरजेनुसार प्लॉटिंग केली जाईल.”शिवाजी राठोड, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, सोलापूर
हा प्रकल्प साकार झाल्यास सोलापूर आयटी हब म्हणून नव्या नकाशावर येण्याची दाट शक्यता असून, शहराच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
.png)
0 Comments