Hot Posts

6/recent/ticker-posts

बाळीवेस परिसर व अक्कलकोट रोड मोकळे; महापालिकेची कारवाई

 बाळीवेस परिसर व अक्कलकोट रोड मोकळे; महापालिकेची कारवाई




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दोन ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. या कारवाईत बाळीवेस परिसर आणि अक्कलकोट रोडवरील वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यात आले.

मंगळवारी सकाळच्या सत्रात बाळीवेस परिसरात भिंतीलगत रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले आणि वाहतुकीस अडथळा ठरणारे पाच खोके जेसीबीच्या सहाय्याने जागेवरच निष्काषित करण्यात आले. यामुळे या परिसरातील रस्ता मोकळा झाला असून वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

सायंकाळच्या सत्रात अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने अक्कलकोट रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ दुसरी कारवाई केली. या कारवाईत रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन चारचाकी हातगाड्या तसेच अन्य अतिक्रमणाचे साहित्य जप्त करण्यात आले.

अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून अपघातांची शक्यता वाढत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी सांगितले. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक रस्ते मोकळे करण्यासाठी अशा अतिक्रमणविरोधी कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहतील. नागरिकांनी नियमांचे पालन करून रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Reactions

Post a Comment

0 Comments