Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपचा प्रभाग ४ मधील ‘रडीचा डाव’ फसला

 भाजपचा प्रभाग ४ मधील ‘रडीचा डाव’ फसला


विश्वनाथ बिडवे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ (ड) मधील राजकीय वातावरण तापले असतानाच, भाजपने टाकलेला कथित “रडीचा डाव” फसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी विश्वनाथ बिडवे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज बाद करण्याचा भाजपकडून केलेला प्रयत्न अखेर अपयशी ठरला आहे.
भाजपचे अनंत जाधव यांनी बिडवे यांनी त्यांच्या मालमत्तेचा कर भरलेला नाही, अशी हरकत दाखल करत अर्ज रद्द करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, निवडणूक कायद्यातील तज्ञ विधिज्ञ अंबरीष खोले यांनी प्रभावी युक्तिवाद सादर करत, संबंधित घर हे बिडवे यांच्या आजोबांच्या नावावर असल्याने उमेदवारावर कर भरण्याची जबाबदारीच येत नाही, हे स्पष्ट केले.
हा युक्तिवाद ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपचे अनंत जाधव यांचे आक्षेप फेटाळून लावत, विश्वनाथ बिडवे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविला. त्यामुळे भाजपचा अर्ज बाद करण्याचा प्रयत्न सपशेल फसला.
दरम्यान, बिडवे यांचा अर्ज मंजूर व्हावा यासाठी आनंद चंदनशिवे व विवेक फुटाणे यांनी सातत्याने पाठपुरावा करत प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली आहे.
या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया देताना विश्वनाथ बिडवे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “भाजपने असे रडीचे डाव टाकून उमेदवारांना त्रास देण्यापेक्षा थेट मैदानात येऊन लढावे. मी जरी लहान दिसत असलो, तरी माझा समाज, मित्रपरिवार आणि मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने माझ्या पाठीशी उभे आहेत. भाजपची ही फसवी आणि दबावाची राजकारणाची पद्धत मतदार सहन करणार नाही,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
या घटनेमुळे प्रभाग क्रमांक ४ मधील निवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्हे असून, उमेदवारी अर्ज छाननीच्या प्रक्रियेत दबाव आणि हरकतींच्या राजकारणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments