तब्बल 35 हजार नागरिक मतदानावर बहिष्कार टाकणार; बॅनर झळकले
मुंबई (कटूसत्य वृत्त):- मुंबईत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून जनजागृती सुरु असताना उच्चभ्रू परिसर अशी ओळख असणाऱ्या जुहूमधील ३५ हजार नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जुहू परिसरात असलेल्या २०० इमारतींमध्ये राहणाऱ्या ३५ हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
तसे बॅनर जुहू रुईया पार्क, कराची सोसायटी परिसरात लागले आहेत.
जुहू परिसरात मिलिटरी रडार असल्याचा फटका इथे राहणाऱ्या नागरिकांना बसतो. गेल्या ३५ वर्षांपासून इथल्या २०० धोकादायक इमारती आणि २ झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास रखडला आहे. नागरिकांचं पुनर्वसन होऊ शकत नसल्यानं मोठी समस्या निर्माण झाली आहे. इथले ३५ हजार नागरिक जीव मुठीत राहत आहेत. आमच्या समस्यांकडे पाहायला लोकप्रतिनिधींना वेळ नाही. मग आम्ही मतदान का करायचं, असा प्रश्न इथले नागरिक विचारत आहेत.
परिसरातील २०० इमारती आणि २ झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या समस्या केंद्र सरकारच्या संरक्षण विभागासमोर मांडल्या. या संदर्भात बराच पाठपुरावादेखील केला. पण हाती काहीच ठोस लागलेलं नाही. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसे बॅनर परिसरात लागलेले आहे. त्यावर जुहू वाचवा, मध्यम वर्ग आणि गरीब कुटुंबांना वाचवा, असा उल्लेख आहे.
SRO150 कायदा कालबाह्य असून त्यामुळे घरं उद्ध्वस्त होत आहेत. १९३९ च्या ब्रिटिश कायद्याच्या अंतर्गत आम्हाला आमच्या घरांमधून हाकलण्यात आलं आहे. २०० इमारती आणि २ झोपडपट्ट्या धोक्यात आल्या आहेत. इथल्या ३५ हजार नागरिकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे मतदानासाठी घराबाहेर पडण्यासाठी पाऊल टाकण्याआधी १०० वेळा विचार करा, असं आवाहन स्थानिकांना करण्यात आलं आहे.
२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्यावेळीही इथल्या नागरिकांनी त्यांचं गाऱ्हाणं मांडलं. निवडणुकीनंतर तोडगा काढू, असं आश्वासन त्यांना देण्यात आलं. पण निवडणुका होऊन वर्ष उलटलं तरीही समस्या कायम आहे. त्यामुळे स्थानिकांनी पालिका निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानावर बहिष्कार टाका, असं आवाहन करणारे बॅनर जुहूमध्ये अनेक ठिकाणी लागले आहेत.
0 Comments