Hot Posts

6/recent/ticker-posts

मुंबई उच्च न्यायालयानेही उज्वला थिटेंचा अर्ज फेटाळला;

 मुंबई उच्च न्यायालयानेही उज्वला थिटेंचा अर्ज फेटाळला;

अनगर नगराध्यक्ष निवडणूक निकालाचा मार्ग मोकळा

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अनगर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत उज्वला थिटे यांचा अर्ज फेटाळला आहे. याआधी सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयानेही निवडणूक प्रशासनाचा निर्णय वैध ठरवत उज्वला थिटे यांचा अर्ज अवैध ठरवून फेटाळला होता. त्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिकाही नामंजूर झाल्याने आता अनगर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अनगर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला आव्हान देत उज्वला थिटे यांनी प्रथम सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने निवडणूक प्रशासनाचा निर्णय योग्य असल्याचे ठरवत तो अर्ज फेटाळला. त्यानंतर त्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयानेही सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत थिटे यांचा अर्ज फेटाळला आहे.

या निर्णयामुळे अनगर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरील कायदेशीर अडथळे दूर झाले असून, निवडणूक निकाल जाहीर करण्याचा मार्ग आता पूर्णतः मोकळा झाला आहे. या प्रकरणाकडे केवळ अनगरच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर अनगरमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. “अनगरसिद्धांच्या नगरीत सलग तिसऱ्यांदा सत्याचा विजय झाला,” अशी प्रतिक्रिया अनगरकर नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. अनगर पंचक्रोशीतून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, न्यायालयाने लोकशाही प्रक्रियेला न्याय दिल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता अनगर नगरपरिषदेच्या राजकारणात पुढील हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, लवकरच नगराध्यक्षपदाचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

परमेश्वर सुध्दा नेहमीच सत्याने वागणाराच्याच पाठीमागे असतो. म्हणूनच अनगरकर हे नेहमीच सत्यानेच वागतात म्हणून उच्च न्यायालयाने ही अनगरकरांना न्याय दिला. 

- माजी आमदार राजन पाटील

Reactions

Post a Comment

0 Comments