मिळालेला जनादेश हा आमचा नैतिक विजय- राम सातपुते
माळशिरस (कटूसत्य वृत्त):- गेल्या ७० वर्षांपासून अकलूजमधील राजकीय व्यवस्थेवर असलेल्या मोहिते-पाटलांच्या वर्चस्वाला यंदा भारतीय जनता पार्टीने जोरदार आव्हान दिले.अकलूज नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रस्थापित व्यवस्थेविरोधात भाजपाने 'कमळ' चिन्हावर आपले पॅनल उभे करून निकराची लढत दिली. जरी पूर्ण सत्ता मिळाली नसली, तरी मिळालेला जनादेश हा आमचा 'नैतिक विजय' असून हा प्रस्थापितांच्या पतनाचा प्रारंभ आहे, अशी भूमिका भाजपा माजी आमदार राम सातपुते यांनी मांडली अकलूज येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी भाजप अकलूज मंडळ अध्यक्ष सुजयसिंह माने पाटील,शहर अध्यक्ष महादेव कावळे, शैलेश कोतमिरे,नूतन नगरसेवक राहुल लोंढे, महेश शिंदे, नगरसेविका दिपाली वाघमोडे,जयश्री एकतपुरे व सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पूजाताई कोतमीरे यांना अकलूजच्या जनतेने सुमारे १० हजार मतांचा भरघोस कौल दिला.विजयी उमेदवाराला ५१ टक्के मते मिळाली असली, तरी एकट्या भाजपाने कोणाचीही मदत न घेता ४१ टक्क्यांहून अधिक मते मिळवून विरोधकांच्या गोटात धडकी भरवली आहे. अनेक प्रभागांमध्ये भाजपाचे उमेदवार अवघ्या २० ते ३० मतांच्या फरकाने पराभूत झाले असल्याचे मा.आ.राम सातपुते यांनी सांगितले.
कोणतेही संस्थात्मक पाठबळ, साखर कारखाने किंवा मोठी आर्थिक रसद नसताना भाजपाचे चार सामान्य पार्श्वभूमीचे उमेदवार निवडून आले आहेत. नूतन नगरसेवक महेश शिंदे चळवळीतील कार्यकर्ता म्हणून आक्रमक विरोधी आवाज मांडणार असून दिपाली वाघमोडे या एका सामान्य रिक्षाचालकाच्या पत्नी असून त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला.राहुल लोंढे हे बौद्ध समाजातील आणि दलित चळवळीतील कार्यकर्ता, ज्यांनी सामान्यांच्या प्रश्नांसाठी लढा दिला तर जयश्रीताई एकतपुरे या माळी समाजातून निवडून आलेल्या सक्षम महिला प्रतिनिधी आहेत.
पुढे बोलताना राम सातपुते म्हणाले "विरोधकांकडे दोन साखर कारखाने, आमदार, खासदार आणि माजी उपमुख्यमंत्र्यांची फौज होती. तरीही त्यांना विजयासाठी गल्लीबोळात फिरावे लागले. हा विजय म्हणजे एखादा पेशंट 'आयसीयू' मधून 'जनरल वार्ड' मध्ये शिफ्ट झाल्यासारखा आहे. त्यांची सत्ता आता खिळखिळी झाली आहे."
निवडणुकीनंतर बोलताना भाजपा माजी आमदार राम सातपुते यांनी स्पष्ट केले की,कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले आणि राऊत नगरमधील दगडफेकीसारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. संविधानाच्या मार्गाने या विकृत राजकारणाचा प्रतिकार केला जाईल.अकलूजमध्ये लवकरच भाजपाचे भव्य कार्यालय सुरू होणार असून, सर्व नगरसेवक तिथे जनतेच्या कामासाठी उपलब्ध असतील.बांधकाम परवाने किंवा जमिनींचे दाखले यासाठी अकलूजच्या जनतेला एक रुपयाही कोणाला द्यावा लागणार नाही, याची काळजी भाजपाचे चारही नगरसेवक घेतील.
या लढ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या पाठबळाबद्दल त्यांचे आभार मानत "ही केवळ निवडणुकीची सांगता नसून, अकलूजमधील नव्या पर्वाची सुरुवात आहे," असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

0 Comments