Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरात बुधवारपासून कै. लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमाला

 सोलापूरात बुधवारपासून कै. लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमाला






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृह (अॅम्फी थिएटर) येथे दिनांक १७ ते १९ डिसेंबर दरम्यान सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कै. लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती चंडक ट्रस्टचे किशोर चंडक व म.सा.प. पुणे, सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

        त्यांचे नातू  किशोर चंडक व त्यांचे पुत्र डॉ. गिरीश चंडक यांनी गेले २८ वर्षे लोणकरणजी स्मृती व्याख्यानमाला सोलापुरात सुरू ठेवली आणि त्याला श्रोत्यांकडून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यंदाचे व्याख्यानमालेचे हे २९ वे वर्ष आहे.
दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी प्रवीण दिक्षीत, मुबंई हे 'सामाजिक सुरक्षा' या विषयावर बोलणार आहेत. दिक्षीत हे महाराष्ट्र राज्याचे माजी पोलिस महासंचालक होते. तसेच ते लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो, व्यवस्थापकीय पोलिस महासंचालक, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, वैद्यकीय महाविद्यालय, यशदा इत्यादी येथे संचालक म्हणुन कार्यरत होते. विशेष म्हणजे त्यांचे पहिले प्रशिक्षण हे सोलापूर येथेच झाले होते. त्यांनी पोलीस व्यवस्थेतील सुधारणांवर वृत्तपत्रे, मासिके, दूरदर्शन वाहिन्या व आकाशवाणीवर लेख आणि मुलाखती दिल्या आहेत. विशिष्ट सेवांसाठी व मेधावी सेवांसाठी त्यांना भारताचे राष्ट्रपती पदक मिळालेले आहे.
१८ डिसेंबर रोजी मा. डॉ. रवींद्रजी तांबोळी, नांदेड यांचे 'विनोदाचे आत्मपर अंतरंग' या विषयावर व्याख्यान होणार आहे. पशुसंवर्धन संचालनालय, पुणे येथे ते सहा. आयुक्त होते. त्यांची अनुवंश, गिरकी, उसंतवाणी, थट्टामस्करी, पत्नीपुराणे, फुकटचेच सल्ले अशी पुस्तके प्रकाशित असून अनेक वृत्तपत्रातून त्यांनी लेखन केले आहे. त्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा पुरस्कार, आचार्य अत्रे विनोदी लेखक पुरस्कार, वि.मा.दि. पटवर्धन पुरस्कार, उत्कृष्ट ललित गद्य साहित्यकृती पुरस्कार, उत्कृष्ट संकीर्ण साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चिं. विं. जोशी स्मृती पुरस्कार आणि डॉ. निर्मलकुमार फडकुले साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत.
दि. १९ डिसेंबर रोजी मा. डॉ. वंदनाजी बोकील - कुलकर्णी, पुणे या 'दवणा अभिवाचन व विवेचन करणार आहेत. वंदनाजी या प्राध्यापक, समीक्षक, लेखक, संपादक आणि अभिवाचक असून पदव्युत्तर पातळीवर अनेक वर्षे मराठी साहित्याचे अध्यापन केले आहे. त्यांनी गेली २० वर्षे विविध नियतकालिकांमधून सातत्याने समीक्षा-संशोधनपर तसेच ललितलेखन केले आहे. त्यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट साहित्यासाठीचा पुरस्कार, तसेच अभिव्यक्ती पुरस्कार मिळालेला आहे.
        मागील २-३ वर्षाप्रमाणे यावर्षी देखील या तीन दिवसाच्या व्याख्यानाचा परामर्श मनोगतातून लिहून पाठवण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. उत्कृष्ट लेखन असेल त्यांना बक्षीस देण्यात येईल. तीन दिवसाचे तीन बक्षीस देण्यात येणार आहेत. मनोगत हे मंत्री चंडक, पार्क चौक, सोलापूर येथे दि.३१ डिसेंबर पर्यंत द्यावयाचे आहेत. मागील वर्षीचे बक्षीस यावर्षी दि. १९ डिसेंबर रोजी व्याख्याना दरम्यान देण्यात येतील.
        या पत्रकार परिषदेस ॲड. जे.जे. कुलकर्णी, प्रा. भीमराव पाटील, बदीउज्जम्मा बिराजदार, प्रा. डॉ. अर्जुन व्हटकर,फैय्याज शेख आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments