ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा रस्तारोको ! सोलापूर विजयपूर महामार्गावर मांडला ठिय्या
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ऊस गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना होत आला. ऊस कायदा १९६६ नुसार ऊस गाळप झाल्यापासून १४ दिवसाच्या आत ऊसबिले जमा करणे बंधनकारक असताना, एक महिना झाला तरीही साखर कारखान्यांनी ऊस बिले जमा केलेली नाहीत.
याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवार
(दि. २८) नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर विजापूर महामार्गावर व्हनमुर्गी फाटा (तेरामेंल) येथे रस्तारोको आंदोलन शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी विविध घोषणा देत शेतकरी संघटनेने येत्या दोन दिवसात सकारात्मक निर्णय न घेतल्यास कर्नाटकमधील शेतकऱ्यांनी ज्याप्रमाणे उग्र आंदोलन केले. त्याप्रमाणे उग्र आंदोलन करू, वेळ पडल्यास कायदा हातात घेऊ असा निर्वाणीचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी यावेळी दिला.
दरम्यान, सोलापूर विजयपूर महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने काही काळ सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा पहावयास मिळाल्या. प्रशासनाने तात्काळ आंदोलनकरते शेतकऱ्यांना महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची सूचना केल्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला.
यावेळी आंदोलनात इकबाल मुजावर, मोहसीन पटेल,पप्पू पाटील, चाँदसो यादगिरे, बसवराज रामपुरे, कमलेश बामगोंडे, तुकाराम शेटसंदी, जावेद आवटी, सिकंदर मकानदार, वसंत पाटील, यासिन मकानदार, नरेंद्र पाटील, अब्दुलराजाक मकानदार, विजय साठे, भागवत बिराजदार, सचिन मस्के आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.

0 Comments