नांदा सौख्य भरे’ उपक्रमातून ६३७ संसार पुन्हा जुळले
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत महिलांच्या सुरक्षितता व कौटुंबिक सलोख्यासाठी राबविण्यात येणारा ‘नांदा सौख्य भरे’ हा उपक्रम प्रभावीपणे यशस्वी ठरत असून, या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक तुटणारे संसार पुन्हा जोडले जात आहेत.
मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली, मा. पोलीस उपआयुक्त मुख्यालय, परिमंडळ, गुन्हे/विशा विभाग, तसेच मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली २२ डिसेंबर २०२५ रोजी महिला सुरक्षा विशेष कक्ष (भरोसा सेल), सोलापूर शहर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत भरोसा सेल अंतर्गत शहरातील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधून महिलांच्या कौटुंबिक, शारीरिक व मानसिक छळाबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल होतात. सन ०१ जानेवारी २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत भरोसा सेलकडे एकूण १३८८ तक्रारी अर्ज प्राप्त झाले होते.
भरोसा सेलमध्ये कार्यरत २ पोलीस अधिकारी व १८ कर्मचारी यांच्या माध्यमातून पती-पत्नी तक्रारींवर सखोल समुपदेशन करून समेट घडवून आणण्याचे काम केले जाते. महिलांना न्याय मिळवून देतानाच, शक्य तिथे संसार टिकवण्यासाठी विश्वासार्ह आणि संवेदनशील मार्गदर्शन करण्यात येते. ज्या प्रकरणांमध्ये समुपदेशनातून तोडगा निघत नाही, त्या प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाणे किंवा कौटुंबिक न्यायालयाकडे प्रकरणे वर्ग केली जातात.
सन २०२५ मध्ये आतापर्यंत भरोसा सेलमार्फत ६३७ पती-पत्नींच्या प्रकरणांमध्ये यशस्वी समुपदेशन करून संसार पुन्हा जोडण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या कार्यक्रमात ३० समेट झालेले जोडपे महिला सुरक्षा कक्षात बोलावून, त्यांच्या सुखी संसाराच्या प्रतीक म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते रोपटे देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित जोडप्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, भरोसा सेलच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी दिलेल्या योग्य समुपदेशनामुळे आपला तुटणारा संसार वाचल्याचे सांगितले. तसेच मा. पोलीस आयुक्त सोलापूर शहर व महिला सुरक्षा विशेष कक्ष (भरोसा सेल) यांचे मनःपूर्वक आभार मानत समाधान व्यक्त केले.
ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील, मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक म.सु.वि. कक्ष श्रीमती स्नेहा म्हेतर, सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती येळे, तसेच भरोसा सेलमधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या सामूहिक प्रयत्नातून साध्य झाली आहे.
महिलांच्या सुरक्षिततेसह कुटुंबसंस्थेचे जतन करण्यासाठी सोलापूर पोलिसांचा हा उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरत आहे.

0 Comments