पंढरपुरात मनसेचा विक्रमी मतांनी विजय; दिलीप धोत्रे ठरले किंगमेकर
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत परिचारक गटाच्या तब्बल चार दशकांच्या सत्तेला सुरुंग लावत तीर्थक्षेत्र आघाडीने दणदणीत यश संपादन केले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांच्यासह प्रभाग क्रमांक १७ मधून मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्नी माधुरी धोत्रे यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला. या यशामागे मनसे नेते दिलीप धोत्रे यांची निर्णायक भूमिका राहिल्याने ते या निवडणुकीचे ‘किंगमेकर’ ठरल्याची चर्चा पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
तब्बल नऊ वर्षांनंतर पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसून आल्या. पंढरपूर नगरपालिकेतील सत्ताधारी पांडुरंग परिवाराच्या विरोधात विठ्ठल परिवाराकडून नगराध्यक्ष पदासाठी एकच उमेदवार असावा, यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पुढाकार घेतला. साखर कारखान्याच्या निवडणुकीत विस्कटलेला विठ्ठल परिवार एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले.
नगराध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवार देण्यात आल्याने तीर्थक्षेत्र आघाडीच्या माध्यमातून विठ्ठल परिवार एकवटला आणि त्याचा थेट फायदा प्रणिता भालके यांना झाला. त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी विक्रमी मतांनी विजय मिळवत पंढरपूरच्या राजकारणात नवा इतिहास रचला.
निवडणूक निकालानंतर या विजयामागील सूत्रधार म्हणून मनसे नेते दिलीप धोत्रे यांचे नाव पुढे येत असून, यामुळे पंढरपुरात मनसेची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे बोलले जात आहे.
पंढरपूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह १८ प्रभागांतील ३६ नगरसेवक पदांसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये भाजप व शहर विकास आघाडीचे २४ नगरसेवक निवडून आले, तर तीर्थक्षेत्र आघाडीचे ११ नगरसेवक आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाला.
जरी नागरिकांनी नगरसेवक पदासाठी भाजपला संख्याबळ दिले असले, तरी नगराध्यक्ष पदासाठी प्रणिता भालके यांना विक्रमी मतांनी निवडून देत जनतेने वेगळा कौल दिला आहे. या निकालाचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निश्चितच उमटतील, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
0 Comments