CEO जंगम यांची संवेदनशील कृती ठरली प्रेरणादायी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत सालसे येथे नुकतीच झालेली गाव भेट व ग्रामपंचायत तपासणी ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया न राहता, माणुसकी आणि संवेदनशीलतेचा जिवंत अनुभव देणारी ठरली. या भेटीदरम्यान पात्र दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत स्वनिधीतून ५ टक्के दिव्यांग कल्याण निधीअंतर्गत आर्थिक मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरली ती जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची माणुसकीपूर्ण आणि संवेदनशील भूमिका. कोणतीही औपचारिकता न आणता, CEO थेट दिव्यांग बांधवांसोबत जमिनीवर बसले आणि आपुलकीने, सन्मानाने त्यांच्या हाती धनादेश दिले. हा क्षण केवळ मदतीचा नव्हता, तर प्रशासन सामान्य माणसाच्या पाठीशी उभे आहे, ही जाणीव करून देणारा होता.
धनादेश स्वीकारताना दिव्यांग लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे अश्रू आणि समाधानाचे भाव उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेले. अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले. लाभार्थ्यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “जिल्हा प्रशासनाकडून मिळालेली ही मदत आम्ही आमच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी वापरणार असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये आम्हीही सक्रिय सहभाग घेणार आहोत.”
ग्रामपंचायत सालसे येथील हा प्रसंग प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिक यांच्यातील नात्याला नवी उंची देणारा ठरला आहे. अधिकार आणि सत्ता यापेक्षा संवेदना, आपुलकी आणि सन्मान अधिक महत्त्वाचा असतो, हे या घटनेतून पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाले.
सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा हा आदर्श क्षण गावकऱ्यांच्या स्मरणात कायम राहणारा ठरला आहे.

0 Comments