लाडक्या बहिणींना 'ई-केवायसी'साठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत!
सोलापूर (कटूसत्य वृत):- महापालिका निवडणुकीत लाडक्या बहिणींची मते आपल्यालाच मिळावीत, या हेतूने भावी नगरसेवक आपापल्या प्रभागांमध्ये 'ई-केवायसी'ची शिबिरे घेत आहेत. सोलापूर शहरात महापालिकेसाठी सव्वानऊ लाख मतदार असून, त्यात पुरुष मतदारांच्या तुलनेत लाडक्या बहिणींचे मतदान अधिक आहे.
त्यामुळे चौका- चौकांत मोफत 'ई-केवायसी'सह अन्य शासकीय योजनांच्या लाभाचे फलक लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
लोकसभेनंतर महायुती सरकारने महिलांसाठी (वय २१ ते ६५ वर्षांपर्यंत असलेल्या महिला) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यावेळी विधानसभेतील अनेक उमेदवारांनी लाडक्या बहिणींची नोंदणी करण्यासाठी शिबिरे घेतली आणि त्याचा त्या उमेदवारांना मोठा लाभ झाला. त्याच धर्तीवर आता भावी नगरसेवक देखील लाडक्या बहिणींना मोफत ई-केवायसी करून देत आहेत.
सोलापूर जिल्ह्यात ११ लाख नऊ हजार महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यात सोलापूर शहरात चार लाख लाडक्या बहिणी आहेत. सोलापूर शहरातील अंदाजे दीड लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वी दोन पैसे खर्च करून चौका- चौकांमध्ये डिजिटल बॅनर लावण्यात आलेले आहेत. 'ई-केवायसी'तून आपल्या प्रभागातील लाडक्या बहिणींची साथ मिळाली तर आपण निश्चितपणे नगरसेवक होऊ, असा विश्वास इच्छुकांना आहे.
सोलापूर शहरातील स्थिती
पुरुष मतदार
४,५७,०९९
महिला मतदार
४,६७,४७१
पुरुषांपेक्षा महिला जास्त
१०,३७२
एकूण मतदार
९,२७,७०६
'ई-केवायसी'ची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी प्रत्येक महिलेस ई-केवायसी करावीच लागणार आहे. त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ई-केवायसीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून, आणखी एकदा मुदतवाढीची शक्यता आहे. मुदतीत ई-केवायसी न केल्यास त्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार आहे.

0 Comments