Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुरात भाजपने निकालापूर्वी केला राडा;

 तुळजापुरात भाजपने निकालापूर्वी केला राडा;


कोयते, गोळीबार, ‘नंगानाच’एक गंभीर जखमी
धाराशिव (कटूसत्य वृत्त) :- तुळजापूर नगर परिषद निवडणुकीच्या निकालापूर्वीच शहरात राजकीय तणाव हिंसक वळणावर गेला असून, भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद पिटूभाई गंगणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांच्यात तीव्र वाद झाला. या वादातून झालेल्या हाणामारीत कुलदीप मगर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्यात आला आहे. त्यांना तातडीने सोलापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या घटनेत दिग्विजय पाटील यांनाही कोयत्याने दुखापत झाली आहे.
गोलाई चौकातील पंचायत समितीजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून हा वाद उफाळून आला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर दोन्ही गटांतील कार्यकर्ते आमनेसामने भिडले. काही वेळातच परिस्थिती चिघळत गेली आणि हातात कोयते व इतर घातक शस्त्रे घेऊन धिंगाणा घालण्यात आला. या गोंधळामुळे परिसरातील वाहतूक ठप्प झाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
हवेत गोळीबार; पुंगळी सापडली. या राड्यात दहशत निर्माण करण्यासाठी हवेत दोन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. घटनास्थळी गोळीबाराची एक पुंगळी सापडल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, हातात कोयते घेऊन धावणारे आणि गोंधळ घालणारे काही जण दिसत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. कोयता गँगशी संबंधित संशयितांचा शोध सुरू असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या हिंसक घटनेमुळे तुळजापूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. नागरिकांनी संयम राखावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
चौकट
निष्पक्ष चौकशीची मागणी
या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणी ॲड. मंजुषा ताई मगर यांनी केली आहे. निवडणूक प्रक्रियेवर अशा हिंसाचाराचा गंभीर परिणाम होतो, असे त्यांनी नमूद केले.

Reactions

Post a Comment

0 Comments