Hot Posts

6/recent/ticker-posts

विधानसभेत आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्याचे प्रलंबित प्रश्न मांडले

 विधानसभेत आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्याचे प्रलंबित प्रश्न मांडले





सांगोला (कटूसत्य वृत्त) :- नागपूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात सांगोला तालुक्यातील विविध विकासकामे व दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सविस्तर मुद्दे मांडून सरकारचे लक्ष वेधले. या प्रश्नांवर शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

सांगोला पंचायत समितीची इमारत तसेच गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने ही १९६५ पूर्वीची असून ती जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे नव्या इमारतींसाठी १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली.

याशिवाय राज्यातील हजारो शिक्षकांच्या टीईटी (TET) संदर्भातील प्रश्नांचा पुनर्विचार करून ते तातडीने मार्गी लावावेत, संचमान्यतेबाबतच्या अटी शिथिल कराव्यात, अशी मागणीही त्यांनी विधानसभेत केली. यावर संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.

महावितरणकडून सकाळ व संध्याकाळी होणारी लोडशेडिंग त्वरित थांबवावी, शेतकऱ्यांना सलग वीजपुरवठा करावा, धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करावे, छावणी चालकांची प्रलंबित बिले तात्काळ अदा करावीत, बँकांनी शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, तसेच अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित अनुदान देण्यात यावे, अशा विविध मागण्या आमदार देशमुख यांनी सभागृहात मांडल्या.या सर्व मागण्यांबाबत संबंधित मंत्रिमहोदयांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments