सनसनाटी आरोप! एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ १४५ कोटींचे ड्रग्ज सापडल्याचा दावा
पुणे (कटूसत्य वृत्त) :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश संभाजी शिंदे यांच्या मालकीच्या सातारा जिल्ह्यातील दरेगावजवळ सावरी येथील तेजयश रिसॉर्टजवळ तब्बल ४५ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किंमत सुमारे १४५ कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या गंभीर प्रकरणाची माहिती सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी लपवून ठेवल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
अंधारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ डिसेंबर रोजी सावरी गावात ही कारवाई करण्यात आली. सुरुवातीला मुकुंदगाव येथे छापा टाकण्यात आला होता. त्या कारवाईचे धागेदोरे पुण्यात पोहोचले असून, विशाल मोरे या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या चौकशीतून सावरी गावातील ठिकाणाची माहिती समोर आली.
सुषमा अंधारे यांनी स्वतः सावरी गावाला भेट दिल्याचा दावा करताना सांगितले की, हे ठिकाण कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात असून, तेथे स्विमिंग टँक आणि रिसॉर्टचे बांधकाम सुरू आहे. रिसॉर्टजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ही कारवाई करण्यात आली.
या ठिकाणी कोणतीही गाववस्ती किंवा मानवी वस्ती नसताना, रिसॉर्ट आणि शेडला जोडणारा सुमारे १२०० मीटर लांबीचा काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यासाठी सुमारे ७५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा दावा अंधारे यांनी केला. गावच नाही, माणसं नाहीत, तरीही हा रस्ता का तयार करण्यात आला, असा सवाल उपस्थित करत त्यांनी संबंधित ठिकाणचे फोटोही पत्रकार परिषदेत दाखवले.
या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, यावर सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
.png)
0 Comments