मोहोळच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस
भाजपा युवानेते क्षीरसागरांना मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- “मोहोळ शहर व तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक त्या निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही,” असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. भाजपा युवनेते सोमेश क्षीरसागर यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती माध्यमांना दिली.
या भेटीत मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध विकास प्रश्न, नगरपरिषद निवडणूक तसेच आगामी काळातील विकास आराखडा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने गेल्या सुमारे ३० वर्षांपासून सुरू असलेला पाटील–क्षीरसागर राजकीय संघर्ष संपुष्टात आल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
सोमेश क्षीरसागर यांनी सांगितले की, मोहोळ नगरपरिषद निवडणूक ही माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा ज्येष्ठ नेते नागनाथभाऊ क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेतेमंडळींच्या एकत्रित ताकदीने लढवली जात आहे. पाटील यांच्या अनुभवपूर्ण नेतृत्वामुळे आणि पक्षातील एकजुटीमुळे आगामी निवडणुकीत भाजपला निश्चितच चांगले यश मिळेल, असा विश्वास त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे व्यक्त केला.
यावेळी सोमेश क्षीरसागर यांनी माजी आमदार यशवंत माने यांच्या कार्यकाळात मोहोळ शहर व तालुक्याला मिळालेल्या विकास निधीचा उल्लेख करत, त्यापेक्षा अधिक निधी आगामी काळात द्यावा, अशी आग्रही मागणी केली. मोहोळ शहर व संपूर्ण मतदारसंघात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, शैक्षणिक व आरोग्य सुविधा तसेच नागरी सोयी-सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मोहोळच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. “मोहोळच्या विकासकामांसाठी निधीची कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही,” असा ठाम शब्द त्यांनी दिल्याचे सोमेश क्षीरसागर यांनी सांगितले.
दरम्यान, पाटील–क्षीरसागर यांच्यातील दीर्घकालीन राजकीय संघर्ष संपल्याने मोहोळ शहरात नागरिकांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या एकजुटीचा फायदा आगामी सर्वच निवडणुकांमध्ये भाजपला होईल आणि शहरासह संपूर्ण मतदारसंघात विकासाचा वेग वाढेल, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

0 Comments