Hot Posts

6/recent/ticker-posts

अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनास निवेदन

 अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनास निवेदन




मोहोळ (कटूसत्य वृत्त):-मोहोळ ते कुरूल–विजयपूर महामार्गावर वाढत असलेल्या अपघातांना येथील जड वाहतूक कारणीभूत असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी मोहोळ येथे केली. आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसवणे, सूचनाफलक लावणे तसेच रस्त्याचे रुंदीकरण करणे या मागण्या त्यांनी प्रशासनाकडे केल्या. येत्या काळात प्रशासन स्तरावरून ठोस उपाययोजना न झाल्यास भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजी-माजी नगरसेवक व भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महसूल प्रशासनास निवेदन देण्यात आले. यावेळी पाटील बोलत होते.

निवेदनात भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुशील क्षीरसागर यांनी नमूद केले की, मोहोळ–कामती–मंद्रुप–विजयपूर रस्ता हा मोहोळ शहरातून जात असून तालुक्यातील दक्षिण भागातील ग्रामीण परिसराला जोडणारा मुख्य मार्ग आहे. या मार्गावरील वाढत्या रहदारीमुळे आजपर्यंत अनेक अपघात झाले असून शाळकरी मुले व ज्येष्ठ नागरिकांनी जीव गमावला, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या रस्त्यावर अद्याप गतिरोधक व सूचनाफलक नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

या महामार्गाचे रुंदीकरण करून किमान दहा मीटर रुंद करणे, साईड पट्ट्या तयार करणे तसेच जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. येत्या काळात हा मार्ग चौपदरीकरण करण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती अजिंक्यराणा पाटील यांनी दिली.

यावेळी बाळासाहेब गायकवाड, संजीव खिलारे, नगरसेवक सतीश काळे, प्रमोद डोके, मुस्ताक शेख, दत्ता खवळे, संतोष सुरवसे, रोहित फडतरे, रुपेश धोत्रे, एजाज तलफदार, अझरुद्दीन कुरेशी, प्रशांत गाढवे, समाधान पाटील, बालाजी नरोटे, नवनाथ गाढवे, ओंकार देशमुख, सागर लेंगरे, नाना डोके, जयवंत गुंड, तुळजाराम धोत्रे, दादा ओहोळ यांच्यासह शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments