Hot Posts

6/recent/ticker-posts

गुरुच साक्षात भगवंताचे रूप असतात

 गुरुच साक्षात भगवंताचे रूप असतात







सोलापूर (कटूसत्य वृत्त):- द्वेष, मत्सर व अहंकार यांचा लवलेशही न ठेवता जो संतोषाने जगतो, सर्वांवर अमर प्रीतीचा वर्षाव करतो, तोच खऱ्या अर्थाने गुरू होय. असा गुरू केवळ उपदेश देत नाही, तर स्वतःच्या आचरणातून जीवनाचा मार्ग उजळून दाखवतो. त्याच्या चरणी गेल्यावर मनातील अंधार दूर होतो आणि आत्म्याला प्रकाशाचा स्पर्श मिळतो म्हणून गुरु साक्षात भगवंताचे रूप असतात असे प्रतिपादन विजयपूरचे महांतेश हिरेमठ यांनी केले.
नीलम नगर येथील नेताजी सुभाष चंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित तपोरत्नं बौद्धिक व्याख्यानमाले प्रसंगी हिरमठ बोलत होते. 'गुरु महात्म्य' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
 हिरेमठ पुढे म्हणाले, जीवन ही एक कठीण पण अर्थपूर्ण परीक्षा आहे. या परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल, तर गुरुभक्ती हाच सर्वात विश्वासार्ह आधार आहे. गुरूवरील निष्ठा, श्रद्धा व समर्पण यांमुळे मन दृढ होते, विचार शुद्ध होतात आणि शेवटी आत्म्याला मुक्तीचा मार्ग सापडतो. गुरू कृपेने जीवनातील अडथळे संधींमध्ये परिवर्तित होतात.
हिरेमठ पुढे म्हणाले,तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींचे कार्य हे खऱ्या अर्थाने अलौकिक व प्रेरणादायी आहे. समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी शिक्षणालाच साधन मानून अनेक शिक्षण संस्था स्थापन केल्या. भावी पिढी सुसंस्कृत, ज्ञानसंपन्न व चारित्र्यवान घडावी या उदात्त हेतूने त्यांनी गुरुकुल परंपरेची पुनर्स्थापना करत विद्यार्थ्यांना विद्यादानाचे पवित्र कार्य सुरू केले.
सज्जनांचा संग करावा, कारण सज्जनसंगातूनच सद्विचारांची बीजे मनात रुजतात. विशेषतः गुरूच्या सानिध्यात राहिल्यास जीवनाला योग्य दिशा मिळते. अशा सान्निध्यात मन शांत होते, अंतःकरण समाधानाने भरते आणि जीवनात सुख व शांती सहज नांदू लागते.
खरे तर जीवनाचे सूत्र अतिशय साधे आहे—येणे, राहणे आणि जाणे. या तीन टप्प्यांमध्येच संपूर्ण जीवन सामावलेले आहे. परंतु या प्रवासाला अर्थ प्राप्त होतो तो गुरूकृपा, सद्विचार, प्रेम व संतोष यांच्या साहचर्याने. गुरूच्या मार्गदर्शनाखाली जगलेले जीवनच खऱ्या अर्थाने सफल, सार्थक आणि मंगल ठरते.अनेक रूपांतून गुरू–शिष्य परंपरेची अपार महती विशद करण्यात आली आहे. गुरू म्हणजे केवळ मार्गदर्शक नव्हे, तर जीवनाला दिशा देणारा प्रकाशस्तंभ आहे. जीवनाच्या प्रवासात हात दूषित न करता, सदाचार, संयम व सत्याच्या मार्गावर चालत उत्तम प्रकारे जीवन जगावे, हा गुरूचा मूलमंत्र आहे. गुरूंचा उपदेश हा अनमोल ठेवा असून तो हृदयात जपल्यास जीवन सुवर्णमय होते, मन शुद्ध होते आणि कर्म पवित्र बनते. गुरूच्या शिकवणीतच शिष्याच्या जीवनाचे सार्थक दडलेले आहे.
यावेळी संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार,संस्थेचे खजिनदार ललिता कुंभार,
वेदमूर्ती श्रीशैल हिरेमठ (आहेरवाडी ),सेवानिवृत्त प्राचार्य रेवणसिद्ध रोडगीकर,संजीव कवचाळे (बोराळे),प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार,मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, मुख्याध्यापक एम.डी.बिराजदार, मुख्याध्यापक श्रावण बिराजदार सेवानिवृत्त शिक्षक पंडित कवचाळे , सरपंच विनोद पाटील ( बोराळे ) लक्ष्मण चिलगेरी, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल पाटील यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments