पंढरपूर-तिरुपतीदरम्यान लातूरमार्गे नव्या रेल्वे सेवेस सुरुवात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर-तिरुपती व्हाया लातूर साप्ताहिक रेल्वेसेवा १३ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगावकर यांनी मंगळवारी दिली.
पंढरपूर (जि. साेलापूर) ते तिरुपती रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी गत अनेक वर्षांपासून प्रवाशांतून हाेत हाेती. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगावकर यांनी १० ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या रेल्वे सल्लागार समिती महत्त्वपूर्ण बैठकीत ही मागणी आग्रहाने लावून धरली. त्यांनी ही रेल्वेसेवा लातूरमार्गावरून पंढरपूर-तिरुपती सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले. त्यांच्या मागणीनुसार दक्षिण मध्य रेल्वे विभागाने गाडी क्रमांक ०७०१२ आणि ०७०१३ क्रमांकाची तिरुपती पंढरपूर-तिरुपती साप्ताहिक रेल्वे सेवा लातूर मार्गे सुरू करण्याला नुकतीच मंजुरी दिली आहे. येत्या शनिवार, १३ डिसेंबरपासून ही गाडी सुरू होणार आहे. गाडी क्रमांक ०७०१२ ही १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी तिरुपती येथून सुटेल. ती गाडी काचीगुडा, सिकंदराबाद, बिदरमार्गे दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, १४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी लातूर स्थानकावर पोहोचेल. ही गाडी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी पंढरपूर स्थानकावर पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७०१३ दर रविवारी पंढरपूरहून रात्री आठ वाजता निघेल. ही गाडी मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी लातूर रेल्वे स्थानकावर पोहोचेल. दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री साडेदहा वाजता तिरुपती स्थानकावर पोहोचेल. या गाडीला एक एसी प्रथमवर्ग, एक एसी फर्स्ट कम-टू-टीअर , दोन एसी-टू-टीअर, ६ एसी थ्री टीअर, ९ स्लीपर क्लास, दोन द्वितीय श्रेणी कम दिव्यांग एसएलआर असे एकूण २३ डबे असणार आहेत.
प्रवाशांच्या प्रतिसादावर ठरणार पुढील रूपरेषा
ही सुविधा तूर्तास १३ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत सुरू असणार आहे. प्रवाशांच्या मिळणाऱ्या प्रतिसादावर या गाडीची पुढील रूपरेषा निश्चित केली जाणार असल्याचे संजय निलेगावकर यांनी सांगितले. शिवाय या बैठकीमध्ये हरंगुळ रेल्वे स्थानकाची प्लॅटफॉर्मची उंची, लांबी वाढविणे, लातूर-पुणे-खडकी इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करणे आदी विषयांवरही महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती निलेगावकर यांनी दिली.

0 Comments