महेंद्र कदम यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-येथील साहित्यिक प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांची कोडोली बेळगाव येथे होणाऱ्या ४१ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. हे संमेलन ११ जानेवारी २०२६ रोजी कोडोली येथे संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनाला फार मोठी परंपरा आहे.
आतापर्यंत भालचंद्र नेमाडे, इंदिरा संत, आनंद यादव, गो.मा. पवार,निर्मलकुमार फडकुले, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, माधवी देसाई, नागनाथ कोत्तापल्ले, ज्ञानेश्वर मुळे, रा. रं. बोराडे, दीनानाथ मनोहर, कृष्णात खोत, आसाराम लोमटे आदी साहित्यिकांनी अध्यक्षपद भूषविले आहे
डॉ. महेंद्र कदम हे सध्या टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत असून, त्यांच्या आतापर्यंत धूळपावलं आगळ आणि तणस या तीन कादंबऱ्या, तो भितो त्याची गोष्ट हा कथासंग्रह, तू जाऊन तीन तपं झाली हा कवितासंग्रह प्रकाशित आहे. तसेच त्यांचे सहा समीक्षाग्रंथ आणि भाषाविषयक ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. धूळपावलं आणि आगळ या कादंबऱ्यासह या कादंबऱ्यांतील काही अंश दहावीच्या मराठीच्या अभ्यासक्रमापासून एम ए च्या अभ्यासक्रमापर्यंत अनेक ठिकाणी अनेक विद्यापीठात अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. राज्य शासनासह त्यांना भैरु रतन दमाणी, बाबा पद्मनजी, मुकुंदराव पाटील आदी वीस पुरस्कार प्राप्त झाले आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कदम यांचे मा. आ. बबनदादा शिंदे मा. आ .संजयमामा शिंदे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह शिंदे, विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांनी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि परिसरातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

0 Comments