जगातले पहिले बांबु विद्यापीठ आटपाडीत उभे करा .
सादिक खाटीक यांची मागणी .
आटपाडी (कटूसत्य वृत्त):-
जगातले पहिले बांबु विद्यापीठ सर्वसंपन्न असलेल्या आटपाडीत उभे करावे . अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केली आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, गृहमंत्री अमित शहा साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २३ मान्यवर महोदयांना पाठविलेल्या खास पत्राद्वारे सादिक खाटीक यांनी ही मागणी केली आहे .
बांबुचे प्रगाढ अभ्यासक आणि कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष श्री . पाशा पटेल यांनी वाळवा तालुक्यातील जुनेखेड येथे बोलताना जगातले पहिले बांबु विद्यापीठ जुनपर्यंत स्थापन करणार असल्याचे भाष्य केले होते . या अनुषंगाने सादिक खाटीक यांनी केंद्र आणि राज्य शासनाकडे या मागणी साठी आग्रह धरला आहे.
सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या आणि माणदेशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आटपाडी येत असल्याने, भविष्यात नवनिर्मित माणदेश जिल्ह्याचे मुख्य ठिकाण बनण्याची सर्व पात्रता असणाऱ्या आटपाडी मध्येच बांबु विद्यापीठ उभारणे, हे पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण माणदेश, लगतचा कर्नाटकाच्या दृष्टीने मोठ्या फायद्याचे होणार आहे .
अनेक देशासह भारतभर सोन्या - चांदीच्या, गलाई व्यवसायाच्या निमित्ताने विखुरलेल्या दोन - तीन लाख माणदेशी माणसांच्या स्वतः च्या भागात प्रचंड शेत जमिनी आहेत . सोन्या चांदीच्या व्यवसायाच्या माध्यमातून लाखो कुटुंबात सद्य स्थितीला आर्थीक संपन्नता आली आहे . शिवाय सर्व माणदेशी तालुक्यात आणि लगतच्या सर्व दुष्काळी भागात कृष्णेचे पाणी आल्याने हा संपूर्ण उपजावू, कोरडा भाग नवक्रांती घडविण्यासाठी सज्ज होणार आहे . बांबु साठी जगात सर्वात उत्तम अशी जमीन माणदेशात उपलब्ध असल्याने या नुतन बांबु विद्यापीठाच्या माध्यमातून बांबूचे हे महात्म्य, ज्ञान, गलाई बांधव, शेतकऱ्यांच्या माध्यमातून सर्व भारतभर मोठ्या गतीने पसरणार आहे .
वर्षानुवर्षे दुष्काळ भाळी मारलेल्या या परिसराने आपल्या प्रचंड मेहनत, कष्टाच्या, बुद्धीमत्तेच्या जोरावर यशस्वी जीवन साकारले आहे . साहित्य, कला, क्रीडा, व्यापार, शेती इत्यादी अनेक क्षेत्रात आटपाडी तालुकावाशीय आणि माणदेशीं माणसांनी मोठी कामगिरी नोंदविली आहे . मराठी भाषेचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगुळकर, ज्येष्ट साहित्यीक व्यंकटेशतात्या माडगुळकर, डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू शंकरराव खरात साहेब , थोर साहित्यीक ना . सं . इनामदार साहेब, आणि औंध संस्थानचे अधिपती भवानराव उर्फ बाळासाहेब पंत प्रतिनिधी या पाच, आटपाडी तालुक्याशी संबंधीत मान्यवरांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषवुन या भागाचे महात्म अधोरेखित केले आहे . राष्ट्रीय नेते, उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल श्री . राम नाईक, एबीपी माझा मराठी न्युज चॅनेल मुंबईचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते सन्मानीत झालेल्या लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपुरकर, थोर साहित्यीक, राजकारणी प्रा . अरुण कांबळे, माजी आमदार जयंत सोहनी, लेखिका शांताबाई कांबळे या सारख्या शेकडो प्रज्ञावंताची आटपाडी तालुका ही जननी, कर्मभूमी आहे .
चार - पाच दशकापूर्वी हायब्रीड ज्वारी, गहु, बाजरी, कपाशी आणि मागच्या दोन दशकात डाळींब लागवड आणि सर्वोत्कृष्ट दर्जाची डाळींब निर्मिती बरोबर हजारो शेततळ्यांच्या निर्मितीतून शासनाचे धोरण परिपूर्ण वास्तवात आणण्याचे काम या भागाने वेळोवेळी केले आहे .
मानव जाती बरोबरच जीवसृष्टीला संजिवनी देणारे बांबु पीक - बांबु उद्योग भारताला जगावर अधिराज्य गाजविण्यास सर्वोतोपरी सहाय्यभूत ठरू शकतो . झाडाच्या अवस्थेत उभा असताना आणि जाळल्या नंतरही ऑक्सीजन देणारा बांबु जागतिक तापमान वाढीच्या समस्येला समर्थ पर्याय ठरू शकतो . सुमारे दोन हजार नावीन्यपूर्ण वस्तु त्यामध्ये घड्याळे, पायमोजे, टी शर्ट, टुथब्रश पासून लोखंड, ॲल्यूमिनियम, सिंमेट , जमिनीतुन मिळणाऱ्या पेट्रोल, गॅस, फरशी यांना उत्तम पर्याय बांबु ठरू शकतो . भुगर्भातील इंधन वायू आणि तेलाच्या जोरावर जगावर स्वामित्व गाजविणाऱ्या सद्य स्थितीतील अरब राष्ट्रांना भविष्यात इंधन संपल्याने जमिनीवर यावे लागणार आहे . त्यावेळी बांबुपासून बनविले जाणारे इंधन जगासमोर एकमेव समर्थ पर्याय ठरणार आहे . ते जगाला पुरवठा करू शकणारे इंधन भारत बांबुपासून जगाला देवू शकणार आहे . पर्यायाने भारत महासत्ता बनणार आहे . देशाला आर्थिक परिवर्तन देण्याच्या उद्देशाने बांबुचे पहिले विद्यापीठ आटपाडीत होणे हा क्रांतीकारी इतिहास ठरणार आहे . तो ठरावा ही न्याय मागणी आहे .
उन्हाळ्यात थंडावा, थंडीत, पावसाळ्यात उबदारपणा देणाऱ्या बांबुच्या घरापासून आणि कपड्यांपासून मानवी जीवन सुसह्य होणार आहे . कोणत्याही ठिकाणी अत्यंत कमी पाण्यात, बिना मशागतीचे येणारे, बांबु पीक एकरी दीड ते दोन लाखाचे उत्पन्न देवू शकते . कोणतेही झाड तोडले की मरते . तथापि बांबु हे एकमेव झाड असे आहे की याला दरवर्षी तोडावे लागते . तसे ते वाढते . तोडले नाही तर मरते . २४ तास ऑक्सीजन देणारा आणि मोठ्या प्रमाणावर हवेतला कार्बन डाय ऑक्साईड शोषणारा बांबु भविष्यात जीवसृष्टीला तारणारा असल्यानेच बांबु पासून शेकडो नवनवीन उद्योग साकरण्यास उपयोगी ठरणार आहे . आटपाडी तालुक्या सारख्या, देशातल्या शेकडो तालुक्यातल्या निम्म्या पडीक जमीनीतून बांबु वर्षाला, प्रत्येक तालुक्याला सरासरी २ - ३ हजार कोटीचे उत्पन्न देवू शकेल . प्रत्येक गाव, खेडे, वाडी, वस्ती, शहरांमध्ये, बांबुच्या विश्वातून कल्पनेतल्या स्वर्गाला वास्तवात पाहता येणार आहे . आटपाडी तालुक्या सारख्या शेकडो तालुक्यांना सर्वसंपन्न बनवायला बांबु पीक, त्यावरील उद्योग, देशभर पोटापाण्यासाठी विखुरलेला हजारोच्या संख्येतला आटपाडी तालुकावाशीय पुन्हा आटपाडी तालुक्याच्या अर्थात आपल्या माय माऊलीच्या कुशीत येत मायमाऊलीच्या आशीर्वादाने सुसंपन्न, सर्वसंपन्न जीवन व्यतीत करू शकणार आहेत . आपले जीवन परिपूर्ण करण्यासाठी बांबु या संजिवनीला आपलेसे करणे. आटपाडी तालुक्याला स्वाभीमानी, सर्वसंपन्न, मजबुत, शक्तीशाली बनविणार आहे . भविष्यात सर्व बाजुंनी सहाय्यभूत ठरणारा बांबु खऱ्या अर्थाने ईश्वरी वरदान ठरणार आहे . हे ईश्वरी वरदान आटपाडी तालुक्याला लाभण्यासाठी प्रत्येक आटपाडी तालुका वाशीयांची पावले बांबु संवर्धनाच्या दिशेने पडली पाहिजेत. शिवाय बांबुचे जगातले पहिले विद्यापीठ आटपाडीत होणे सर्व बाजूंनी न्यायाचे व समर्पक होणार आहे .
आटपाडीतल्या बांबु विद्यापीठामुळे, बांबुच्या जगातल्या शेकडो जाती, त्यावरील शेकडो नावीण्यपूर्ण निर्मिती, उद्योग, व्यवसाय, यांचा परिपूर्ण, शास्त्रीय, अभ्यास करता येणार असल्याने बांबु विश्वासाठी हजारोंच्या संख्येत कुशल निष्णात पिढ्या या विद्यापीठातून घडणार आहेत . कष्टाळु, मेहनती आणि हुशार हजारो माणदेशी विद्यार्थ्यासाठीचे आटपाडीतले बांबु विद्यापीठ जगाला प्रेरक, मार्गदर्शक ठरणार आहे .
पिकाखालील आणि पडीक अशा लाखो हेक्टर जमिनीत बांबु लागवड करण्यासाठी आटपाडी व माणदेश परिसरातले लाखो शेतकरी तयार होण्याची मोठी शक्यता असल्याने आणि बांबु वर आधारीत विविध प्रकारची उद्योग शृंखला, कारखानदारी येथे भविष्यात साकारली जाण्यास प्रचंड अनुकुलता असल्याने, जगातले पहिले बांबु विद्यापीठ आटपाडी येथेच उभे करणे. हे बहुउपयोगी असलेल्या कल्पवृक्ष बांबुच्या अर्माद फायद्यांसाठी अति अत्यावश्यक ठरणार आहे .
जगातले पहिले विद्यापीठ आटपाडीत व्हावे यासाठी महाराष्ट्रातील संसद सदस्य, विधीमंडळ सदस्यांनी आणि विशेष करून सांगली जिल्ह्याशी संबंधीत सर्व संसद सदस्य, विधीमंडळ सदस्यांनी केंद्र आणि राज्य सरकार कडे जोरदार आवाज उठवावा . आटपाडीतल्या या बांबु विद्यापीठासाठी सर्व आटपाडी तालुका वाशीयांनी, विविध पक्षाचे पदाधिकारी, संस्था, संघटनांनी बांबु विद्यापीठ आटपाडीत साकारे पर्यत प्रचंड चळवळ, आंदोलन उभे करावे . असेही आवाहन सादिक खाटीक यांनी केले आहे .



0 Comments