भैय्या चौक–दमाणीनगरचा ऐतिहासिक रेल्वे पूल नामशेष
सोलापूरच्या कष्ट, गुणवत्ता आणि अभिमानाचा साक्षीदार इतिहासात जमा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भैय्या चौक ते दमाणीनगर परिसराला जोडणारा १०३ वर्षांचा ऐतिहासिक रेल्वे पूल आज प्रत्यक्ष अस्तित्वात नसला, तरी त्यामागची प्रेरणादायी कहाणी अजूनही अनेकांना माहिती नाही. ब्रिटिश काळातील म्हणून ओळखला जाणारा हा पूल प्रत्यक्षात ब्रिटिशांनी नव्हे, तर सोलापूरचे सुपुत्र हाजी हजरत खान यांनी बांधला होता, ही बाब आजच्या पिढीसाठी अभिमानाची आणि विचार करायला लावणारी आहे.
ब्रिटिश राजवटीत इंग्रजांचे अधिकृत Government Contractor म्हणून काम करणारे हाजी हजरत खान हे अल्पशिक्षित असले, तरी अत्यंत दूरदृष्टी असलेले आणि कार्यकुशल व्यक्तिमत्त्व होते. १९२२ साली उभा राहिलेला हा पूल म्हणजे केवळ दगड-चुना नव्हता, तर स्थानिक श्रम, नियोजन आणि तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना होता.
या पुलाच्या बांधकामासाठी मोहोळ तालुक्यात स्वतंत्रपणे दगडखाण सुरू करण्यात आली. त्या खाणीतून मिळालेल्या मजबूत दगडांचा वापर करून हा पूल उभारण्यात आला. ब्रिटिश सरकारने घालून दिलेल्या सर्व कठोर तांत्रिक आणि सुरक्षेच्या अटी पूर्ण करत हा पूल बांधण्यात आला होता. याच दर्जेदार कामामुळे हा पूल तब्बल १०३ वर्षे कोणत्याही मोठ्या अडचणीशिवाय कणखरपणे उभा राहिला.
या पुलावरून केवळ रेल्वेच नव्हे, तर सोलापूरच्या सामाजिक आणि औद्योगिक जीवनाची चाके फिरत राहिली. लाखो कामगार, सायकली, मोर्चे, ट्रक, एसटी बसेस आणि सोलापूरचा संपूर्ण गिरणगाव या पुलावरून दररोज मार्गक्रमण करत होता. औद्योगिक चळवळींपासून सामाजिक आंदोलनांपर्यंत अनेक ऐतिहासिक क्षणांचा हा पूल साक्षीदार राहिला.
आज या पुलाचे केवळ अवशेष उरले आहेत. काळाच्या ओघात विकासाच्या नावाखाली हा ऐतिहासिक वारसा नामशेष झाला असला, तरी त्याचे महत्त्व कमी होत नाही. हा पूल म्हणजे सोलापूरच्या कष्टकरी परंपरेचा, स्थानिक गुणवत्तेचा आणि स्वाभिमानाचा जिवंत इतिहास होता, असे ज्येष्ठ नागरिक आणि इतिहासप्रेमी सांगतात.
इतिहासकारांच्या मते, अशा वास्तू केवळ दळणवळणाची साधने नसतात, तर त्या शहराच्या ओळखीचा भाग असतात. भैय्या चौक–दमाणीनगर पूल ही सोलापूरच्या अस्मितेची खूण होती. दुर्दैवाने, त्याच्या इतिहासाची नोंद पुरेशा प्रमाणात झाली नाही, ही खंत व्यक्त केली जात आहे.
आज या पुलाची जागा रिकामी असली, तरी हाजी हजरत खान यांच्या कार्याचा ठसा सोलापूरच्या इतिहासात कायम राहणार आहे. विस्मरणात गेलेल्या, पण अभिमानाने सांगण्यासारख्या अशा अनेक कथा शहराच्या कोपऱ्यांत दडलेल्या आहेत. त्या पुन्हा उलगडण्याची, पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, अशी भावना शहरवासीय आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.
.png)
0 Comments