ऊसदरासाठी रास्तारोको; नंतर शेतकऱ्यांची कारखान्याच्या गव्हाणीत उड्या
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- ऊसाला पहिली उचल ३,५०० रुपये मिळावी या मागणीसाठी विविध शेतकरी संघटनांनी वाखरी येथे पुणे महामार्गावर तब्बल दीड तास रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनानंतर शेतकरी अचानक आक्रमक झाले आणि खर्डी येथील सीताराम साखर कारखान्याकडे धडक मारत थेट उसाच्या गव्हाणीत उड्या मारून आंदोलन तीव्र केले. या दरम्यान कारखान्याचे गाळप काही काळ ठप्प झाले.
शेतकरी संघटनेचे समाधान फाटे, बाळासाहेब दगदाळे, राहुल पवार आणि गणेश कौलगे गेल्या चार दिवसांपासून उपोषण करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी रयत क्रांती आणि बळीराजा शेतकरी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उतरले. दीड तास महामार्ग रोखल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालकेही आंदोलनात सहभागी झाले होते.
भालके म्हणाले, “मागील वर्षी निवडणूक लक्षात घेऊन साखर कारखानदारांनी जास्त दर जाहीर केला; पण यंदा दराबाबत मौन पाळले आहे. नगरपरिषद निवडणुकीत रोज पंढरीत दाखल होणारे पालकमंत्री आता कुठे आहेत?” असा प्रश्न त्यांनी केला.
रास्तारोकोनंतर शेतकरी अधिकच आक्रमक झाले आणि साखर कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला. खर्डी येथील सीताराम कारखान्याच्या गेटवर पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला, पण शेतकऱ्यांनी चकवा देत थेट गव्हाणीत उड्या मारल्या. घोषणाबाजी आणि गोंधळामुळे कारखान्याचे कामकाज थांबले.
दरम्यान, ऊसदराच्या चर्चेदरम्यान सहकार शिरोमणी कारखान्याचे माजी संचालक आणि सीताराम कारखान्याचे पदाधिकारी यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. कारखान्याचे संस्थापक शिवाजीराव कळुंगे यांची कन्या शोभा कळुंगे यांनी आंदोलकांशी चर्चा करून पहिली उचल ३,००० रुपये देण्याची घोषणा केली. आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनात विष्णू बागल, दीपक भोसले, तानाजी बागल, सचिन पाटील, दीपक पवार, माउली जवळेकर, रणजित बागल, अजित बोरकर, बाळासाहेब बागल, मोहन अनपट, समाधान गाजरे, दत्ता बागल आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
.png)
0 Comments