वीरशैव लिंगायत प्रीमियर लीगच्या अध्यक्षपदी महेश बिराजदार, कार्याध्यक्षपदी शंकर गाडी तर उपाध्यक्षपदी मल्लिकार्जुन उळागड्डे यांची निवड
वीरशैव लिंगायत प्रीमियर लीगच्या पदाधिकाऱ्यांची निवड; पाचव्या पर्वाच्या तयारीला वेग
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वीरशैव लिंगायत युथ ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित वीरशैव लिंगायत प्रीमियर लीग (VLPL) च्या पाचव्या पर्वाच्या तयारीस सुरुवात झाली असून, नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीत महेश दादा बिराजदार यांची लीगच्या अध्यक्षपदी, शंकर गाडी यांची कार्याध्यक्षपदी, तर मल्लिकार्जुन उळागड्डे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
VLPL च्या पाचव्या पर्वाची महत्त्वपूर्ण बैठक केदारनाथजी बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत स्पर्धेचे स्वरूप, कार्यक्रमांचे वेळापत्रक, लिलाव पद्धती, संघांचे व्यवस्थापन आणि संपूर्ण स्पर्धेच्या रचनेवर सविस्तर चर्चा झाली.
१६ संघ मैदानात; खेळाडूंची निवड लिलावातून
या सीझनमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या स्वरूपातील VLPL स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. खेळाडूंची निवड नेहमीप्रमाणे लिलाव पद्धतीद्वारे केली जाणार आहे. समाजातील तरुणांना संघांमध्ये निवड मिळावी आणि व्यावसायिक पातळीचा अनुभव मिळावा, हा लिलाव पद्धतीमागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
तरुणांना मोठे व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न
वीरशैव लिंगायत समाजातील जास्तीत जास्त तरुणांनी पुढे येऊन क्रीडा क्षेत्रात आपली ओळख निर्माण करावी, यासाठी VLPL हा मोठा उपक्रम गेल्या काही वर्षांत महत्त्वाचा मंच ठरला आहे. या स्पर्धेमुळे तरुणांना शहर आणि जिल्हास्तरावर स्वतःची प्रतिभा सादर करण्याची संधी मिळत असल्याचे समिती सदस्यांनी नमूद केले.
समाजातील तरुणांनी ऑनलाईन फॉर्म भरून नोंदणी करण्याचे आवाहन कमिटी सदस्य गौरव जक्कापुरे, गुंडूराज गुळगोंडा, सिद्धेश माळी, आकाश हरकुड, मुन्ना बिराजदार व शंकर धल्लू यांनी केले.
महेश दादांच्या नेतृत्वामुळे लीगला नवी ऊर्जा
VLPL ला गेल्या काही वर्षांत मिळालेली लोकप्रियता आणि भक्कम संघटना उभारण्यात अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे महेश दादा बिराजदार यांचे योगदान मोलाचे असल्याचे समितीच्या सदस्यांनी बैठकीत नमूद केले.
सोलापूर जिल्ह्यातील लिंगायत समाजातील तरुणांसाठी क्रीडा क्षेत्रात भक्कम व्यासपीठ निर्माण करण्याची महेश दादांची तळमळ, दूरदृष्टी आणि बांधिलकी यामुळे VLPL च्या आयोजनाला अधिक बळ आणि नवी ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
VLPL च्या पाचव्या पर्वाबाबत पुढील काही दिवसांत संघरचना, लिलाव दिनांक आणि स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

0 Comments