ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वतीने सोलापुरात रविवारी बंजारा सुसंवाद मेळावा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वतीने रविवार दि. 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सोलापूर येथे भव्य बंजारा सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा विजापूर रोडवरील पोतदार इंटरनॅशनल स्कूलजवळ असलेल्या पूजा लॉन येथे होणार असल्याची माहिती संघाचे माजी नगरसेवक प्रा. भोजराज पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या अध्यक्षपदी लातूर येथील बापूराव राठोड यांची निवड झाल्यानंतर राज्यभर संघटन मजबूत करण्यासाठी व्यापक पातळीवर शाखा बांधणीचे कार्य सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरात हा सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आल्याचे प्रा. पवार यांनी स्पष्ट केले. या मेळाव्याच्या माध्यमातून बंजारा समाजातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समाजबांधव यांच्यात संवाद साधून संघटनेची दिशा व आगामी वाटचाल ठरवण्यात येणार आहे.
या मेळाव्यात संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात येणार असून, अलीकडेच नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या बंजारा समाजातील नगरसेवकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यामुळे समाजातील लोकप्रतिनिधींना बळ मिळून संघटनात्मक एकोपा अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
मेळाव्याचे उद्घाटन ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती प्रकाश चव्हाण राहणार आहेत. यावेळी माजी नगरसेवक प्रा. भोजराज पवार, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेचे जिल्हाध्यक्ष संदीप राठोड, लातूर जिल्हाध्यक्ष संजय राठोड, माजी नगरसेवक प्रकाश राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम राठोड, माजी महापौर अलका राठोड, माजी नगरसेवक लाला राठोड, बंटी राठोड, सुभाष चव्हाण, शैलजा राठोड, अश्विनी चव्हाण, मेनका राठोड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
बंजारा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय सक्षमीकरणासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार असून, समाजातील युवकांनी, महिला आणि ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. भोजराज पवार यांनी केले आहे.
दरम्यान, या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेला संदीप राठोड, सचिन पवार, रमेश पवार, विशाल पवार, महेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

0 Comments