सोलापूर जिल्हा शैक्षणिक कलाशिक्षक संघाचा ४ तारखेला पुरस्कार सोहळा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा शैक्षणिक कलाशिक्षक संघाच्या वतीने रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर मंदिराजवळ भव्य पुरस्कार वितरण व पारितोषिक समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कार, जिल्हास्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार, कलाप्रेमी पुरस्कार तसेच विद्यार्थ्यांच्या रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष शेरशहा डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कलाशिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला असून, यावर्षी सोलापूर जिल्ह्यातून सेवानिवृत्त कलाशिक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
तसेच जिल्हास्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार २०२६ महेश छत्रबंद, सुवर्णा भुसने, शोभा बिरादार आणि नागराज रमणशेट्टी यांना देण्यात येणार आहे.
याशिवाय कलाप्रेमी पुरस्कार २०२६ नंदकुमार विजापूरे, विजया मोरे, गीता पवार, सुनिता घाडगे आणि मधुरा छत्रे यांना प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमधील कला आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कलाविषयक आवड निर्माण होण्यास आणि त्यांचे कौशल्य विकसित होण्यास मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दत्तात्रय सावंत, पंडित भिमण्णा जाधव, प्राचार्य राम ढाले, सचिव – श्री बृहन्मठ होटगी संस्था, सोलापूर, सचिव शांतय्या स्वामी – महासिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ, भंडारकवठे, सचिव सुधीर भरले, किरण पुजारी, प्राचार्य नितीन झाडबुके तसेच अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष शेरशहा डोंगरे यांची उपस्थिती लाभणार आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि कला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेस शशिकांत सदाफुले, संतोष धारेराव, षण्मुखानंद दाते, पंडित स्वामी, मदगोंडा बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.

0 Comments