सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे ४६ वे वार्षिक अधिवेशन अरण येथे
अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे ४६ वे वार्षिक अधिवेशन रविवार दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी अरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथे संपन्न होणार आहे. या अधिवेशनास जिल्ह्यातील सर्व ग्रंथालय प्रतिनिधी, ग्रंथमित्र व वाचनसंस्कृतीचे कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ व स्वागताध्यक्ष ग्रंथमित्र हरिदास रणदिवे यांनी केले आहे.
अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रतिनिधींच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मोडनिंब येथे एसटीने येणाऱ्या प्रतिनिधींना अधिवेशन स्थळी पोहोचण्यासाठी सकाळी ९.०० ते १०.३० या वेळेत मोडनिंब ते अरण अशी यशोदा गुरुकुल स्कूल बसची मोफत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या अधिवेशनाच्या निमित्ताने प्रतिनिधींना संत सावता माळी यांच्या संजीवन समाधी असलेल्या तीर्थक्षेत्र अरण येथील समाधी मंदिराचे दर्शन घेण्याची संधीही मिळणार आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या, प्रशस्त व शांत वातावरणातील यशोदा गुरुकुल सभागृहात हे अधिवेशन पार पडणार असल्याने प्रतिनिधींना अनुकूल आणि सकारात्मक वातावरणात चर्चासत्रे व कार्यक्रमांचा लाभ घेता येणार आहे.
अधिवेशनादरम्यान ग्रंथालय चळवळीच्या विस्तारासंदर्भात चर्चा, भविष्यातील उपक्रमांची दिशा, तसेच जिल्ह्यातील वाचनसंस्कृती अधिक बळकट करण्यासाठी विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे. याच अधिवेशनाच्या ठिकाणी दुपारी ५.०० वाजता सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व संलग्न ग्रंथालयांचे प्रतिनिधी, पदाधिकारी व ग्रंथप्रेमींनी या अधिवेशनास उपस्थित राहून संघाच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
.png)
0 Comments