Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रीधर कुलकर्णी यांच्याविरोधात कोर्टात कायदेशीर कारवाईसाठी दावा दाखल

 श्रीधर कुलकर्णी यांच्याविरोधात कोर्टात कायदेशीर कारवाईसाठी दावा दाखल


११ गुंठे जमिनीच्या खरेदीखतास टाळाटाळ व अतिक्रमणाचा आरोप

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर येथील सिव्हील कोर्टाने दिलेल्या आदेशाचा जाणीवपूर्वक अवमान केल्याच्या आरोपाखाली श्रीधर व्यंकटेश कुलकर्णी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईसाठी सोलापूर जिल्हा न्यायालयात दावा दाखल केल्याची माहिती शिवाजी भगवान साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकरणात मे. सिव्हील जज्ज सिनियर डिव्हीजन, सोलापूर यांनी दिनांक १३ सप्टेंबर २०२२ रोजी दुय्यम निबंधक, अक्कलकोट येथे झालेल्या नोंदणीकृत कब्जा साठेखतानुसार कब्जा वहिवाटीस कोणताही अडथळा करू नये, असा कायमस्वरूपी आदेश दिला होता. मात्र, प्रतिवादी श्रीधर व्यंकटेश कुलकर्णी व इतरांनी सदर आदेशाचे पालन न करता ११ गुंठे जमिनीचे नोंदणीकृत खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यापूर्वी या संदर्भात स्पेशल मु. नं. १०१/२०२१ असा दावा मे. सिव्हील जज्ज सिनियर डिव्हीजन, सोलापूर न्यायालयात दाखल करण्यात आला होता. या दाव्याच्या सुनावणीअंती तत्कालीन दिवाणी न्यायाधीश श्री. ए. ओ. जैन यांनी रजिस्टर कब्जा साठेखत दस्त क्र. १६४२/२०१८ नुसार वादीच्या नावावर खरेदीदस्त नोंदवून देण्याचा आदेश दिला होता. सदर दावा खर्चासह मंजूर करण्यात आला असून, वादीने उर्वरित ४.५ लाख रुपये विक्री मोबदला न्यायालयात जमा करावेत व तीन महिन्यांच्या आत विक्री दस्त नोंदवून द्यावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. आदेशाचे पालन न झाल्यास न्यायालयामार्फत दस्त अंमलात आणण्याची मुभा वादीला देण्यात आली होती.

तसेच प्रतिवादी क्रमांक १ ते ५ यांना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता दाव्याच्या मालमत्तेवरील कब्जा व वहिवाटीत अडथळा आणण्यास कायमस्वरूपी मनाई आदेशही देण्यात आला होता. मात्र, या आदेशांची पूर्ण माहिती असूनही प्रतिवादी श्रीधर कुलकर्णी यांनी आजपर्यंत नोंदणीकृत खरेदीखत करून दिलेले नाही, असा आरोप वादीकडून करण्यात आला आहे.

उलट, प्रतिवादी श्रीधर कुलकर्णी यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत वादीच्या कब्जा साठेखतातील ११ गुंठे जमिनीवर घुसखोरी व अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सदर जागेवर मोठे लोखंडी पोल उभे करून पत्र्याचे शेड उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, त्या ठिकाणी शाबादी फरशी आणून ठेवण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या सर्व प्रकाराचे पुरावे म्हणून संबंधित जागेचे रंगीत छायाचित्रे न्यायालयात सादर करण्यात आली असून, वादीने सदर बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी वादीचे वकील अ‍ॅड. विजय पंडित शिंदे यांनी दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी न्यायालयात अवमानासंदर्भात दावा दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत वादी शिवाजी साळुंखे यांनी दिनांक ०८ डिसेंबर २०२३ रोजी पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सोलापूर तसेच पोलीस निरीक्षक, उत्तर पोलीस स्टेशन, अक्कलकोट यांना लेखी तक्रार दिली असून, अद्याप पोलीस प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

तसेच वादीच्या ताब्यात देण्यात आलेल्या सुमारे ११,००० चौ. फूट जागेपैकी अंदाजे २,००० चौ. फूट जागा प्रतिवादीने बळकावल्याचा आरोप असून, या जागेची शासकीय मोजणी करण्यासाठी अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालय, अक्कलकोट यांच्यामार्फत मोजणी करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली आहे.

प्रतिवादी श्रीधर कुलकर्णी यांच्याविरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याने त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वादीकडून करण्यात आली आहे.

या प्रकरणात वादीकडून अ‍ॅड. विजय शिंदे तर प्रतिवादीकडून अ‍ॅड. विनोद सुरवसे काम पाहत असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments