महापालिका निवडणुकीसाठी ३४ अधिकाऱ्यांची टीम नियुक्त
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेतील जवळपास चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर अखेर सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने निवडणूक प्रक्रिया निपक्ष, निर्भय व सुरळीत पार पाडण्यासाठी व्यापक तयारी सुरू केली असून, विविध कामकाजासाठी २१ स्वतंत्र कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.
या निवडणूक यंत्रणेचे एकूण नियंत्रण महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे असणार असून, अतिरिक्त आयुक्तांसह आठ नोडल अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली महापालिकेतील ३४ विविध विभागांतील प्रमुख अधिकाऱ्यांची टीम नेमण्यात आली आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी **दि. १५ जानेवारी रोजी मतदान** तर **दि. १६ जानेवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर** होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूकपूर्व तयारीपासून ते निवडणूक कालावधीतील सर्व कामकाजासाठी नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
या यंत्रणेमध्ये दोन अतिरिक्त आयुक्त, सामान्य प्रशासन उपायुक्त, नगररचना उपसंचालक, मुख्य लेखापरीक्षक, मुख्य लेखापाल, आरोग्य अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी आदी आठ नोडल अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन, नगरसचिव विभाग, जनसंपर्क, भूमी व मालमत्ता, शिक्षण मंडळ, निवडणूक विभाग, नगर अभियंता कार्यालय, परिवहन, संगणक विभाग, आरोग्य व अग्निशमन विभागातील एकूण ३४ वरिष्ठ अधिकारी कार्यरत राहणार आहेत.
चौकट
निवडणुकीसाठी असणार २१ कक्ष
महानगरपालिकेच्या निवडणूक कामकाजासाठी पुढील २१ कक्ष स्थापन करण्यात आले आहेत -
* आदर्श आचारसंहिता व्यवस्थापन
* टपाली मतपत्रिका व टपाली मतदान
* जनसंपर्क व प्रसिद्धी तसेच पेड न्यूज कक्ष
* विविध परवाना व एक खिडकी योजना
* मतदान जनजागृती
* मतदार यादी व्यवस्थापन व मतदान केंद्र निश्चिती
* मतदान केंद्र व आर.ओ. कार्यालय सुविधा
* न्यायिक व विधी कक्ष
* ईव्हीएम व्यवस्थापन
* निवडणूक कर्मचाऱ्यांची निवास व भोजन व्यवस्था
* मतदान केंद्रांवरील कर्मचारी नियुक्ती
* क्षेत्रीय अधिकारी व मतमोजणी अधिकारी नियुक्ती
* अधिकारी व कर्मचारी उपलब्धता कक्ष
* निवडणूक कर्मचारी प्रशिक्षण
* निवडणूक स्टेशनरी व साहित्य व्यवस्थापन
* मतपत्रिका छपाई व वितरण
* मतदान केंद्र रूट प्लॅन
* संगणकीय कामकाज
* निवडणूक खर्च व्यवस्थापन
* कर्मचारी मानधन व मुशाहिरा वाटप
* प्राथमिक व आपत्कालीन आरोग्य सुविधा
* अग्निशमन साहित्य, वाहने व मनुष्यबळ व्यवस्थापन
महानगरपालिकेच्या या व्यापक तयारीमुळे आगामी सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक, शांततेत व कार्यक्षमतेने पार पडेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
0 Comments