खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली वाणिज्यिक कॉम्प्लेक्स उभारण्याची मागणी
अकलूज (कटूसत्य वृत्त):-
कुर्डुवाडी येथील कुर्डुवाडी-पंढरपूर मार्गावरील जुना मीटर गेज रेल्वे ट्रॅक सध्या वापरात नसून त्या ठिकाणी रेल्वेची मौल्यवान जमीन रिक्त व अनुपयोगी अवस्थेत पडून आहे. त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारून विकासात्मक वापर करण्यात यावा, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन केली.
या संदर्भात खासदार मोहिते पाटील यांनी सांगितले की, संबंधित जमिनीचा वाणिज्यिक दृष्टीने योग्य वापर केल्यास रेल्वे प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर महसूलवाढ होऊ शकते. त्याचबरोबर परिसरात रोजगारनिर्मिती होऊन व्यापारवृद्धीस चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. तसेच रेल्वे प्रवाशांसाठी आवश्यक व आधुनिक सुविधा उपलब्ध होण्यासही मदत होणार आहे.
कुर्डुवाडी-पंढरपूर मीटर गेज मार्गाअंतर्गत उपलब्ध असलेल्या या रिक्त रेल्वे जमिनीचे तातडीने सर्वेक्षण करून त्या ठिकाणी वाणिज्यिक कॉम्प्लेक्स, बिझनेस हब किंवा मल्टी-युटिलिटी सेंटर उभारण्यास मान्यता देण्यात यावी, अशी मागणी खासदार मोहिते पाटील यांनी केली.
या मुळे रेल्वेला दीर्घकालीन स्वरूपात महसूलवाढ होईल, स्थानिक नागरिकांसाठी रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होतील, स्टेशन परिसर अधिक विकसित होईल तसेच संपूर्ण परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून रेल्वे मंत्रालयाने आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी अपेक्षा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केली आहे.

0 Comments