लोकसभेत जोरदार गदारोळ; प्रणिती शिंदे थेट छतावर चढल्या
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- लोकसभेत आज विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. त्याला कारणीभूत ठरले मोदी सरकारने नव्याने आणलेले विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) बिल 2025 (VB-G RAM G).
हे बिल यूपीए सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी कायद्याची जागा घेणार आहे. कायद्याच्या नावातून महात्मा गांधींचे नाव वगळण्यात आल्याने काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचे खासदार आज संसदेत चांगलेच आक्रमक झाले.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज लोकसभेत VB-G RAM G बिल सादर केले. हे बिल लोकसभेत चर्चेसाठी स्वीकृत करण्यास विरोधकांनी जोरदार विरोध केला. काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनके खासदारांनी या बिलाला कडाडून विरोध केला. महात्मा गांधी यांचे नाव काढून सरकार त्यांचा अपमान करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
नव्या कायद्यामुळे ग्रामीण भागातील नागिरकांच्या रोजगाराच्या अधिकारावर गंडांतर येईल, राज्यांवर मोठा आर्थिक बोजा पडेल, सरकार आपली जबाबदारी झटकत आहे, असे अनेक आक्षेप विरोधकांनी घेतले. मात्र, कृषिमंत्री चौहान यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. महात्मा गांधी आमच्या मनात आहेत. रामराज्य ही त्यांचीच संकल्पना होती. त्यांचे शेवटचे शब्दही हे राम हे होते. या कायद्याच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करण्याचे त्यांचे स्वप्न सरकार पूर्ण करणार असल्याचे चौहान म्हणाले.
चौहान बोलत असताना विरोधी पक्षातील खासदारांनी हातात महात्मा गांधी यांचे पोस्टर्स घेत जोरदार घोषणाबाजी केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोरील मोकळ्या जागेत जमा होत खासदारांनी चौहान यांच्याकडे आपला मोर्चा वळविला. त्यांच्या भाषणादरम्यान घोषणा देत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. अखेर अध्यक्षांनी या बिल स्वीकृत केले. त्यानंतर विरोधक लोकसभेत घोषणाबाजी देतच संसदेच्या बाहेर आले.
संसदेच्या आवारात विरोधकांचे आंदोलन सुरू असतानाच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे संसदेच्या जुन्या इमारतीच्या गेट क्रमांक एकच्या पोर्चच्या छतावर चढल्या. त्यांच्यासोबत खासदार कुमारी शैलजा आणि अन्य काही खासदारही होते. त्यांच्या हातात महात्मा गांधी यांचे पोस्टर्स होते. सर्व खासदार घोषणाबाजी करत सरकारच्या नव्या कायद्याविरोधात आक्रमक झाले होते.
खासदारांनी थेट संसदेच्या छतावर चढून आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये प्रणिती शिंदे आघाडीवर होत्या. खासदारांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. दरम्यान, आगामी काळात या कायद्याचा मुद्दा चांगलाच वादग्रस्त ठरणार असल्याची चिन्हे आहेत. याच अधिवेशनात हा कायदा मंजूर होण्याची शक्यता धूसर आहे.

0 Comments