Hot Posts

6/recent/ticker-posts

क्षमतेनुसार जागावाटपातूनच महायुती शक्य - पालकमंत्री गोरे

 क्षमतेनुसार जागावाटपातूनच महायुती शक्य - पालकमंत्री गोरे




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महापालिका निवडणुकांसाठी भाजप सक्षमपणे तयारीत असून या निवडणुकीत महायुती निश्चित होईल. मात्र, ही महायुती स्थानिक पातळीवरील क्षमतेनुसार जागावाटपातूनच शक्य आहे, असे स्पष्ट मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी व्यक्त केले.

महापालिकेत विविध शहर विकास कामांचा शुभारंभ तसेच रोड स्वीपिंग यंत्रणा आणि नव्या घंटागाड्यांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सोलापूर महापालिकेच्या १०२ जागांसाठी भाजपकडे सर्वच प्रभागांतून १२०० हून अधिक इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. इच्छुकांची मोठी संख्या पाहता भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात महायुती होणार का, असा प्रश्न विचारण्यात आला असता गोरे यांनी महायुतीचे स्पष्ट संकेत दिले.

महापालिका निवडणुका या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहरातील आमदारांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील. महायुतीबाबत स्थानिक पातळीवर आमदारांना निर्णय घेण्याचे अधिकार असतील. सर्व मित्रपक्ष एकत्र चर्चा करून पुढील कार्यवाही पूर्ण करतील आणि त्यास वरिष्ठ पातळीवरून ‘ग्रीन सिग्नल’ मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

महायुती करताना सत्तेतील मित्रपक्षांची स्थानिक क्षमता, प्रभाव आणि जिंकण्याची ताकद यांचा विचार करूनच जागावाटप होईल. ज्या ठिकाणी मित्रपक्ष सक्षम असतील, तेथे त्यांना जागा देऊन महायुती यशस्वी केली जाईल. यासाठी आवश्यक त्या ‘तडजोडी’ करण्याची क्षमता भाजप नेतृत्वाकडे असून पालकमंत्री म्हणून आपली जबाबदारी आपण निभावू, असे गोरे यांनी स्पष्ट केले.

भाजपने मोठ्या निधीच्या माध्यमातून शहरात चौफेर विकास केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढली असली, तरी उमेदवारी देताना प्रथम जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल. त्याचबरोबर ज्या ठिकाणी जो उमेदवार सक्षम आहे आणि जिथे भाजपची जागा निश्चित होऊ शकते, अशाच ठिकाणी उमेदवारी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

Reactions

Post a Comment

0 Comments