महावितरणची घरबसल्या सेवा; दोन महिन्यांत ५८ हजार ग्राहकांनी नावात बदल केला
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-महावितरणने वीज कनेक्शनच्या नावात बदलासाठी सुरू केलेल्या स्वयंचलित मंजुरी सुविधेमुळे राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातून ५८ हजार १६७ ग्राहकांनी घरबसल्या वीज कनेक्शनच्या नावात बदल करून घेतला, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. या लाभार्थ्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील वीज ग्राहकांचाही समावेश आहे.
यासोबतच मंजूर वीजभार वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन सुविधेचा १० हजार ४२८ ग्राहकांनी लाभ घेतला आहे. वीज ग्राहकांना अधिकाधिक सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देऊन त्यांना कार्यालयात जाण्याची गरज भासू नये, या उद्देशाने महावितरणकडून विविध डिजिटल सुविधा कार्यान्वित करण्यात येत आहेत.
घर अथवा अन्य मालमत्तेच्या खरेदी-विक्री, वारसा हक्क किंवा इतर कारणांमुळे मालकीत बदल झाल्यानंतर वीजबिलावरील नाव बदलणे आवश्यक असते. यासाठी आता महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे ‘लॉग-इन’ करून ऑनलाइन अर्ज करता येतो. नाव बदलण्याचे कारण निवडल्यानंतर आवश्यक ते दाखले ऑनलाईन अपलोड करून प्रक्रिया शुल्क भरावे लागते. त्यानंतर ३ ते ७ दिवसांत नाव बदलाची प्रक्रिया पूर्ण होते.
तसेच लघुदाब वर्गवारीतील वीज भारवाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्याच्या निर्णयामुळे घरगुती ग्राहकांना, विशेषतःप्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेणाऱ्यांना, तसेच औद्योगिक, व्यावसायिक व इतर लघुदाब ग्राहकांना मोठा फायदा होत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
0 Comments