बाबासाहेबांच्या विचारांवर उभा आहे आधुनिक भारत :- आ. दिलीप सोपल
बार्शी (कटूसत्य वृत्त):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देऊन लोकशाहीची मजबूत पायाभरणी केलीच; परंतु त्याचबरोबर जलसंधारण, जलसंवर्धन, कृषी व विद्युत क्षेत्रातही मूलभूत आणि क्रांतिकारी योगदान दिले, असे प्रतिपादन बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी केले.
प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित एकदिवसीय प्रांतिक बहिष्कृत परिषदेचे उद्घाटन आ. दिलीप सोपल यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर येथील ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अंबाजोगाई येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे उपस्थित होते.
आ. सोपल पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रथम सोलापूर जिल्ह्यात बार्शी येथे आले, याचा बार्शीकरांना अभिमान आहे. बाबासाहेबांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार संघर्षाशिवाय दिला. त्यामुळेच आज सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येतो.
अध्यक्षीय भाषणात दत्ता गायकवाड यांनी सोलापूर जिल्ह्यात बाबासाहेबांनी केलेल्या भेटींचा सविस्तर आढावा घेतला. तर डॉ. कमलाकर कांबळे यांनी बाबासाहेबांच्या चळवळीचा, त्यागाचा आणि क्रांतिकारक लढ्याचा विचार मांडला.
यावेळी व्यासपीठावर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रशांत पैकेकर उपस्थित होते. तसेच दत्ता गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे आणि बार्शीतील कांदा व्यापारी सावळा शिंदे यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. टी. एस. मोरे यांनी केले.नागनाथ सोनवणे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अंजना गायकवाड यांनी केले.
या परिषदेसाठी प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी विष्णू कांबळे, प्रा. डॉ. आर. बी. भोसले, प्रा. डॉ. शशिकांत गायकवाड, प्रा. डी. डी. मस्के, प्रा. अशोक वाघमारे, प्रा. एस. एन. शिंदे, प्रा. टी. एस. गायकवाड, तसेच जगन्नाथ शिवशरण, सुदर्शन ओहाळ, नवनाथ कदम, सुनील कांबळे, भीमराव कदम, विक्रम सुरवसे, मधुकर पालखे, रावसाहेब भालेराव, प्राचार्य रत्नदीप सोनकांबळे, प्रा. तानाजी ठोंबरे, डॉ. दिलीप कदम, श्यामराव जवंजाळ, बी. बी. भालेराव** यांच्यासह राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

0 Comments