Hot Posts

6/recent/ticker-posts

रामायणाच्या कथांतून विद्यार्थ्यांचे संस्कारमूल्य शिक्षण

 रामायणाच्या कथांतून विद्यार्थ्यांचे संस्कारमूल्य शिक्षण




करमाळा (कटूसत्य वृत्त):- दत्तकला इंटरनॅशनल स्कूल, करमाळा येथे रामायण या पवित्र व संस्कारक्षम संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाचा शुभारंभ आदिनाथ साखर कारखान्याचे ज्येष्ठ माजी संचालक लालासाहेब जगताप व कौशल्यादेवी जगताप यांच्या हस्ते झाला. दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ व सचिवा माया झोळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या पदाधिकारी सारिका झोळ, जयमाला बांदल, धनंजय अडसूळ, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर, शाळेच्या संचालिका नंदा ताटे व प्राचार्या सिंधू यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी रामायणातील विविध प्रसंगांचे नाट्यरूप सादरीकरण, संवाद, संगीत व भावपूर्ण अभिनयाच्या माध्यमातून केले. प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, हनुमान व रावण यांच्या भूमिका साकारताना विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनय कौशल्याचे दर्शन घडवले.

यावेळी सचिवा माया झोळ तसेच अन्य मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त व नैतिक मूल्यांची रुजवणूक होते, असे मत व्यक्त केले. आजच्या तांत्रिक व स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे तर आध्यात्मिक व सांस्कृतिक संस्कारांचीही नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

रामायण व भगवद्गीता हे आपले अमूल्य धर्मग्रंथ असून त्यातील सत्य, कर्तव्य, संयम, त्याग व नीतिमूल्ये दैनंदिन जीवनात अंगीकारल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निश्चितच होईल, असा विचार यावेळी मांडण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या संचालिका नंदा ताटे यांनी सर्वांचे आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments