Hot Posts

6/recent/ticker-posts

महापालिका निवडणुकीपूर्वी सोलापुरात युती चर्चांना वेग

 महापालिका निवडणुकीपूर्वी सोलापुरात युती चर्चांना वेग




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीबाबतची पहिली अधिकृत बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत शिवसेना शिंदे गटाने महापालिकेतील एकूण १०२ जागांपैकी सुमारे ५० टक्के जागांची मागणी भाजपकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हॉटेल बालाजी सरोवर येथे झालेल्या या बैठकीस पालकमंत्री जयकुमार गोरे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, उत्तमप्रकाश खंदारे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील तसेच शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या वतीने युतीसंदर्भातील मागण्या पालकमंत्र्यांकडे लेखी स्वरूपात सादर करण्यात आल्या.

बैठकीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून जागावाटपाबाबत योग्य व सन्मानजनक तोडगा काढण्यात येईल. युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली असून येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजपने यापूर्वीच महापालिका निवडणुकीसाठी ‘अबकी बार, ७५ पार’ असा नारा दिला आहे. त्यामुळे जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये तडजोड कशी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बैठकीत राज्य पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती कायम ठेवण्यावर भर दिल्याचेही नमूद करण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीत भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी महायुती करण्याची भूमिकाही चर्चेत आहे. मात्र, युतीबाबत लवकर निर्णय न झाल्यास शिवसेना शिंदे गटाकडून पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने कार्यकर्त्यांकडूनही युतीबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी होत आहे. भाजप–शिवसेना युतीची चर्चा सध्या निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून पुढील एक-दोन दिवसांत सोलापूरच्या राजकीय समीकरणांचे अंतिम चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments