Hot Posts

6/recent/ticker-posts

सिध्देश्वर कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचा शुभारंभ

 सिध्देश्वर कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचा शुभारंभ




सोलापूर (प्रतिनिधी):- सुमारे दहा वर्षांपूर्वी असलेले शेतीमालाचे दर आजही कमी-अधिक प्रमाणात तसेच आहेत. मात्र, शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री व खतांचे दर कैकपटीने वाढले आहेत. ट्रॅक्टरसह अन्य यंत्रांच्या किमतींमध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याने शेती अडचणीत आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर शेतीपूरक व्यवसाय वाढविणे गरजेचे असून, त्यासाठी कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.

गुरुवारी ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर यात्रेनिमित्त होम मैदानावर आयोजित **श्री सिध्देश्वर कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे** उद्घाटन डॉ. ओम्बासे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी श्री सिध्देश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी होते.

यावेळी यात्रा समितीचे अध्यक्ष महादेव चाकोते, स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, सिध्देश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, सिध्देश्वर बँकेचे अध्यक्ष नरेंद्र गंभीरे, पंच कमिटीचे विश्वस्त मल्लिनाथ मसरे, आत्माचे प्रकल्प संचालक कांतप्पा खोत, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, स्मार्ट एक्स्पोचे संचालक सोमनाथ शेटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

डॉ. ओम्बासे म्हणाले, पूर्वी प्रत्येक गावात बैलजोडी असायची, तर आज बेंदूर पूजनासाठीही बैल दिसत नाहीत. उलट ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. शेतीमालाच्या किमती आणि यंत्रांच्या किमती यांची तुलना केली तर शेतकरी किती अडचणीत आहे हे स्पष्ट होते. यावेळी त्यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन आधुनिक यंत्रांची कार्यपद्धती जाणून घेतली.

प्रास्ताविकात कृषी प्रदर्शन समितीचे प्रमुख गुरुराज माळगे यांनी २५ ते २९ डिसेंबर या कालावधीत भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनाची माहिती दिली.
कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) निवृत्त संचालक विजयकुमार बरबडे म्हणाले, यंदा प्रदर्शनासाठी जर्मन हँगर उभारण्यात आला असून ३०० पेक्षा अधिक स्टॉल्स लावण्यात आले आहेत. रोटरी क्लबच्या माध्यमातून पुष्प प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी व कृषीपूरक उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब म्हमाणे यांनी केले, तर संजीव समन यांनी आभार मानले.
यावेळी सिध्देश्वर बमणी, बाळासाहेब भोगडे, अॅड. शिवशंकर बिराजदार, राजशेखर पाटील, सुभाष मुनाळे, विश्वनाथ लब्बा, मल्लिकार्जुन कळके, महादेव जम्मा, विद्याधर मुलगे, सुरेश झळकी, पशुपतीनाथ माशाळ, डॉ. राजेंद्र घुली, शिवानंद पाटील, रतन रिक्के, प्रमोद बिराजदार निंबर्गी यांच्यासह सिध्देश्वर साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक व पंच कमिटीचे विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 चौकट
शेतकऱ्यांची उत्पादकता वाढीसाठी तंत्रज्ञानाची गरज

शेतीमालाच्या दरवाढीच्या तुलनेत उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी संकटात आहे. उत्पादकता वाढविण्यासाठी व खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, विशेषतः एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. यंदाच्या प्रदर्शनात एआय आधारित स्वयंचलित यंत्रांचे स्टॉल्स लावण्यात आले असून, पुढील वर्षी एआय आधारित लाईव्ह प्रोजेक्ट स्टॉल उभारण्याचा मानस आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन एआय तंत्रज्ञानाविषयी माहिती घ्यावी, असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments