पक्षनिष्ठेच्या त्यागाला न्याय मिळणार का?
सलग तीन वेळा माघार घेतलेल्या कार्यकर्त्यास स्वीकृत नगरसेवक पद देण्याची जोरदार मागणी
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- मंगळवेढा नगरपरिषदेच्या अलीकडील निवडणुकांनंतर शहरातील राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून, या पार्श्वभूमीवर शनिवार पेठ भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते सर्जेराव आवताडे यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. पक्षश्रेष्ठींच्या शब्दासाठी सलग तीन वेळा नगरसेवक पदाच्या निवडणुकीतून माघार घेणाऱ्या या निष्ठावंत कार्यकर्त्यास स्वीकृत नगरसेवक पदाची संधी द्यावी, अशी जोरदार मागणी शहरातील विविध स्तरांतून पुढे येत आहे.
आजपर्यंत पक्ष व पक्षश्रेष्ठींचा आदेश हाच आपला धर्म मानत, सर्वच बाबतीत सक्षम असूनही सर्जेराव आवताडे यांनी नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणातून सलग तीन वेळा माघार घेतली. या कृतीतून त्यांनी पक्षावर असलेली निष्ठा, आपुलकी व प्रेम कृतीतून सिद्ध केले आहे. राजकारणात पदापेक्षा पक्षमहत्त्वाचा मानणारा असा त्यांचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आवताडे गटाच्या विजयात त्यांचा परिवार सक्रियपणे सहभागी होता. विशेषतः युवा नेता विनायक उर्फ केशव आवताडे यांनी या निवडणुकीत मोलाची भूमिका बजावत विजयासाठी पराकाष्ठा केली. त्यांच्या नियोजनबद्ध कामामुळे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याच्या क्षमतेमुळे आवताडे गटाचा विजय साकार झाला.
मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीत शनिवार पेठ भागातून नगरसेवक निवडून आणण्यात आवताडे कुटुंबीयांचे मोठे योगदान राहिले आहे. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मागील निवडणुकांतही आवताडे गटाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. या विजयामागे सूक्ष्म नियोजन, चाणाक्ष प्रचार आणि प्रभावी संपर्क यांचा मोठा वाटा असून, त्यात केशव आवताडे यांची भूमिका संपूर्ण तालुक्याने अनुभवली आहे.
ग्रामीण भागातील युवकांवर असलेली त्यांची मजबूत पकड, युवकांना योग्य दिशा देण्याची क्षमता आणि विजयाची सांगड घालण्याची तल्लख बुद्धिमत्ता यामुळे केशव आवताडे हे मंगळवेढा शहर व तालुक्यातील आवताडे गटाचे खंदे समर्थक व स्टार प्रचारक म्हणून ओळखले जातात.
आपला असो वा विरोधक, सर्वांनाच एकत्र घेऊन काम करणारा, शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगणारा चेहरा म्हणून सर्जेराव आवताडे यांच्याकडे पाहिले जाते. याच सर्व बाबी लक्षात घेता, मंगळवेढा शहरातून स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देऊन त्यांच्या आजपर्यंतच्या त्यागाला व पक्षनिष्ठेला योग्य न्याय द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
आगामी काळात पक्षश्रेष्ठी या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे मंगळवेढा शहरासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
0 Comments