जन्मठेप झालेल्या आरोपीस उच्च न्यायालयात जामीन मंजूर:- ॲड. जयदीप माने
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मरवडे, ता. मंगळवेढा येथे दिलीप साहेबलाल नदाफ याचा लोखंडी टॉमी डोकीत मारून खून केल्या प्रकरणी मयताचा चुलत भाऊ सैफन बंडू नदाफ (रा. बनतांडा, ता. मंगळवेढा) याला पंढरपूर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सदर शिक्षेविरुद्ध आरोपी सैफन बंडू नदाफ याने मुंबई उच्च न्यायालयात अपील व जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच चे न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक व न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठासमोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
मयत दिलीप नदाफ व त्यांचा चुलत भाऊ सैफन नदाफ यांच्यामध्ये शेत जमिनीच्या हद्दीच्या कारणावरून भांडणे होत होती. घटनेच्या आदल्या दिवशी पुन्हा त्याच कारणावरून भांडणे झाली होती. घटने दिवशी आरोपीच्या वडिलांनी सदरचा हद्दीचा दगड हलवला, त्यामुळे झालेल्या भांडणात आरोपीने मयत दिलीप यांच्या डोक्यात टॉमी मारून खून केल्याच्या आरोपावरून मंगळवेढा पोलिसांनी आरोपी विरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले होते.
या प्रकरणी उच्च न्यायालयात आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. पंकज देवकर यांनी काम पाहिले.

0 Comments