अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकपदांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या मतदान प्रक्रियेला शहरातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. झाले. नगराध्यक्षपदासाठी एकूण ६ उमेदवार, तर नगरसेवकपदांच्या २५ जागांसाठी ७६ उमेदवार रिंगणात होते. एकूण ८२ उमेदवारांने भवितव्य मतदान
यंत्रात सीलबंद झाले असून निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर जोणार आहे.
सकाळी थंडीमुळे मतदानाचा वेग मंद होता. पहिल्या टप्यात ( ७.३० ते ९.३०) ८.१६ टक्के मतदान नोंदले गेले. त्यानंतर दुपारी १.३० पर्यंत ३७.८५ टक्के, तर ३.३० पर्यंत ५२.२८ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. संध्याकाळच्या सत्रात मतदानाचा वेग वाढत गेला आणि अखेरीस एकूण ३८ हजार ४४२ पैकी २४
हजार ६६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये १२ हजार २२८ पुरुष, १२ हजार ३२९ महिला आणि इतर वर्गातील ४ मतदारांचा समावेश होता.
मतदान प्रक्रियेदरम्यान शहरात राजकीय घडामोडींनाही वेग आला होता. नगराध्यक्षपदाने उमेदवार भाजपने मीलन कल्याणशेट्टी काँग्रेसचे अश्पाक बळोरगी आणि शिवसेनेचे रईस टिनवाला यांनी आपापल्या प्रभागात मतदान केले.
दिवसभर विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी मतदान केंद्रांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. भाजपकडून आमदार सचिन कल्याणशेट्टी अमोलराजे भोसले, शिवशरण जोजन, महेश इंगळे, महेश हिंडोळे, आनंद तानवडे यांनी अनेक प्रभागांना भेटी दिल्या. शिवसेना शिंदे गटाकडून माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, बाबासाहेब पाटील, रईस टिनवाला यांनी
मतदान केंद्रांवर बारकाईने लक्ष ठेवले होते. काँग्रेसकडून मल्लिकार्जुन पाटील आणि निशांत कवडे हे दिवसभर विविध मतदान केंद्रांवर फिरून माहिती घेत होते. पाच मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. मात्र, तत्काळ मशीन बदलून मतदान सुरळीत सुरू करण्यात आले. प्रभाग क्र. ९ बूथ क्र. २ उर्दू शाळा विठ्ठल मार्केट येथे सर्वाधिक गोंधळ पाहायला मिळाला.
मतदानास साडेसातला सुरुवात झाली असली तरी बिघाडामुळे साडेदहापर्यंत केवळ १० मतदान झाले होते. मशीन तीन ते चार वेळा बदलावी लागली, तर मतदार रांगेत दीर्घकाळ थांबले. शहरातील एकूण पाच मतदान केंद्रांवर अशाच स्वरूपाचे बिघाड नोंदले गेले होते. अनेक प्रभागांमध्ये चुरशीचे मतदान झाले. प्रभाग क्रमांक ३ अ मध्ये भाजपने मुस्तफा गवंडी विरुध्द काँग्रेसचे मुस्तफा बळोरगी, प्रभाग क्रमांक ४ अ मध्ये रिपाइंचे अविनाश महिखाये यांच्या प्रवेशामुळे तिरंगी लढत, प्रभाग क्रमांक ६ व मध्ये यशवंत धोंगडे विरुध्द सिध्दाराम आळगी, तसेच
प्रभाग क्रमांक ८ व मध्ये महेश हिंडोळे विरुद्ध आकाश शिंदे यांच्यात संघर्ष दिसून आला. प्रभाग
क्रमांक ९ व मध्ये सद्दाम शेरीकर, शकील ख्रिस्तके (काँग्रेस), राहुल भाकरे (शिवसेना) व देवेंद्र शिंदे ( शिवसेना उबाठा) यांच्यामध्ये चौरंगी लढत झाली. प्रभाग क्रमांक ११ अ आणि ब मध्ये महेश इंगळे व आरती गायकवाड यांच्यामुळे दिग्गजांचा मुकाबला विशेष लक्षवेधी ठरला.
दुपारच्या सत्रात मतदान सुरू असतानाच न्यायालयाने मतमोजणीची तारीख रद्द करून पुढे ढकलल्याची माहिती मिळाल्याने काही उमेदवार आणि मतदारांमध्ये नाराजी दिसून आली. यंदा अक्कलकोट नगरपरिषदेचे मतदान इतर नगरपरिषदांच्या तुलनेत कमी झाल्याचे चित्र समोर आले असून याचा फायदा किंवा तोटा कोणत्या पक्षाला होणार याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, वयाच्या ७५ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावत श्री स्वामी समर्थ अनछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांनी श्रीमंत कमलाराजे चौकातील श्रीमंत राणी निर्मलाराजे कन्या प्रशाला
(प्रभाग क्र. ७) येथे मतदान केले. दिवसभर ठिकठिकाणी वयोवृद मतदारांना घरातून मतदानासाठी आणण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
चौकट
पिंक बूथ ठरले लक्षवेधी
शहरातील निर्मलाराजे कन्या प्रशाला येथील बूथ क्रमांक ७/१ ला 'पिंक बूथ' घोषित करण्यात आले होते. या बूथवरील मतदानाची संपूर्ण प्रक्रिया महिला कर्मचायांमार्फत पार पडली. महिलांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने हा बूथ शहरासाठी विशेष मानला गेला. मतदारांमध्येही या बूथबद्दल विशेष उत्सुकता दिसून आली.

0 Comments