लोकशाही, महिला सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी
आवाज उठत राहील -आ.राजू खरे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-आज नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी अध्यक्षांनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना आ. राजू खरेंनी महाराष्ट्रातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांवरील वाढते अत्याचार आणि लोकशाही मूल्यांवर होत असलेले आघात अत्यंत ठाम आणि आक्रमक शब्दांत सभागृहासमोर मांडले.
महाराष्ट्रात महिलांवर, लहान वयाच्या मुलींवर होत असलेले अमानुष अत्याचार हे केवळ कायदा-सुव्यवस्थेचे अपयश नसून लोकशाहीवरचा घाला आहे. मालेगाव येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेला बलात्कार व निर्घृण हत्या ही संपूर्ण राज्याला हादरवणारी घटना आहे. अशा नराधमांना कोणतीही दया न दाखवता कठोरात कठोर शिक्षा होईल, असा स्वतंत्र आणि प्रभावी कायदा करण्यात यावा, अशी ठाम मागणी आ. राजू खरेंनी सभागृहात केली.
त्याचप्रमाणे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अंनगर नगरपंचायतीत घडलेला प्रकार हा लोकशाहीची हत्या करणारा आहे. नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करू पाहणाऱ्या एका महिलेला गुंडशाही व दहशतीच्या जोरावर रोखण्याचा प्रयत्न झाला. तिच्या मागे गाड्या लावून दबाव टाकण्यात आला, ऍफिडेविटसाठी साक्षीदार मिळू नयेत यासाठी सुनियोजित कट रचण्यात आला. हे प्रकार लोकशाहीला काळिमा फासणारे असून, यावर तात्काळ कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.असे ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य व संविधानिक अधिकार जपले गेले पाहिजेत. मात्र काही प्रवृत्तीमुळे आज संविधान धोक्यात आले आहे आणि कायदा व सुव्यवस्थेची अक्षरशः पायमल्ली होत आहे, ही गंभीर बाब आ.राजू खरेंनी अध्यक्षांच्या व सभागृहाच्या ठामपणे निदर्शनास आणून दिली.
यासोबतच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेती, पिके, घरे आणि पशुधन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. लाखो रुपयांचे पशुधन वाहून गेले असताना केवळ ३५ हजार रुपयांची मदत अपुरी आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर किमान ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी कळकळीची आणि ठाम मागणी आ. राजू खरेंनी सभागृहासमोर ठेवली.
लोकशाही, महिला सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी माझा आवाज अधिक तीव्रतेने उठत राहील. शासनाने आता केवळ घोषणा न करता ठोस आणि न्याय्य निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा आ.राजू खरेंनी व्यक्त केली.

0 Comments