जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून मदत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांत शेती जमीन खरडून जाणे, वाहून जाणे तसेच गाळ साचण्याचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल घेत राज्य सरकारने जिल्ह्यातील २० हजार ४२१ शेतकऱ्यांना ५७ कोटी ५८ लाख ९८ हजार रुपयांची मदत जाहीर केली असून, पुढील आठवड्यापासून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
बाधित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सध्या सुरू असून, तालुक्यांकडून आतापर्यंत सात हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित याद्यांचे अपलोडिंग येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महापुरात जमीन वाहून जाणे,
जमीन खरडून जाणे तसेच शेतजमिनीवर मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने एकूण १२ हजार ४६० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पिकांच्या नुकसानीप्रमाणेच या आपत्तीची मदतही शेतकऱ्यांना दिली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

0 Comments