जयहिंद विद्यालयामध्ये गणितीय शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन
कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- कसबे तडवळे येथील जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, क. तडवळे या ठिकाणी 22 डिसेंबर थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणितीय शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. प्रतिमापुजानानंतर कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच विद्यालयातील गणित विषयाचे अध्यापन करणारे जे. बी. बोराडे, ए. जी. कोरडे व एस. टी. पालके यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संदिप पालके यांनी गणित दिनाचे महत्व सांगून विद्यार्थ्याना गणित विषयात गोडी निर्माण व्हावी यासाठी गणितीय शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले हे सांगितले. यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनींनी गणितावरील गीत, उखाणे व मनोगत व्यक्त केले. श्रीमती तवले यांनी गणित दिनाबद्दल माहिती सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. यानंतर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले संदीप नलावडे यांनी गणितातील गमती जमती, कोडी, आपला व गणिताचा संबंध याबद्दल माहिती सांगून गणिताचे महत्त्व पटवून दिले.प्रमुख पाहुणे मोईन आतारी यांनी गणित व आपले जीवन यांचा संबंध सांगून आपल्या परिसरात सुद्धा गणित लपलेले आहे, हे पटवून दिले. या कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक साहित्याची माहिती मान्यवरांना सांगितली. या प्रदर्शनात जवळजवळ 45 शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांनी तयार केले होते. प्रदर्शन पाहून सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी विशाल जमाले,उपसरपंच हरून शेख, शा. व्य. समितीचे उ. हनुमंत पवार,अरुण पाटील, भागवत शिंदे,सुहास सावंत,सागर पवार,अमर शेख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वामिनी थोडसरे व कु. श्रद्धा पवार आणि आभार प्रदर्शन पी. के. ठाकरे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

0 Comments