Hot Posts

6/recent/ticker-posts

महाविकास आघाडीच्या जोरदार मुसंडीचा माकपचा वज्रनिर्धार- कॉ. आडम (मास्तर)

 महाविकास आघाडीच्या जोरदार मुसंडीचा माकपचा वज्रनिर्धार- कॉ. आडम (मास्तर)





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरवासीयांना महानगरपालिका प्रशासनाकडून नियमितपणे स्वच्छ पिण्याचे पाणी, उत्तम प्रतीचे रस्ते, प्रकाशमान रस्ते दिवे, तसेच सुरळीत मलनिस्सारण व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा ठाम निर्धार महाविकास आघाडीने केला आहे. प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक, स्वच्छ व सुंदर सोलापूर ही सोलापूरकरांची आदर्श संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी केले.

महानगरपालिका संचलित प्राथमिक व माध्यमिक शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारून शिक्षणाचा अधिकार अधिक सक्षम व अद्ययावत करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येतील. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहराला प्राणवायू पुरवणारी उद्याने आज गैरप्रवृत्तींचे अड्डे बनली असून, या उद्यानांचे पुनर्निर्माण व सुशोभीकरण करण्यासाठी महाविकास आघाडी सातत्याने पाठपुरावा करणार आहे.

युजर चार्जेसच्या नावाखाली हद्दवाढ भागातील नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवली जाईल. नागरिकांच्या सेवेसाठी असलेली आरोग्य व्यवस्था अत्याधुनिक यंत्रसामग्री, पुरेशी औषधे तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सक्षम करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले जाईल. सोलापूर शहराला जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी तसेच शहरातील ऐतिहासिक वास्तूंना जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. बदलत्या सोलापूरला उमलते, लोकाभिमुख नेतृत्व देण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडता, खोट्या आश्वासनांना पायदळी तुडवत लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा व महाविकास आघाडीच्या हाती सत्ता द्यावी, असे आवाहन कॉ. आडम यांनी केले.

दरम्यान, मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय, दत्त नगर येथे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर ईच्छुक उमेदवार तसेच आघाडीतील पहिल्या टप्प्यात अंतिम करण्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर), पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर) आणि पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. एम. एच. शेख यांनी घेतल्या.

या प्रसंगी मंचावर माजी नगरसेविका कॉ. कामिनीताई आडम, कॉ. नलिनीताई कलबुर्गी, कॉ. नसीमा शेख, कॉ. सुनंदाताई बल्ला, कॉ. अॅड. अनिल वासम आदी मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण सोलापूर शहरातून ६५ ईच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज सादर केले होते. त्यापैकी पक्षाचे प्राबल्य असलेल्या तसेच निवडणूक लढवण्याची क्षमता असलेल्या संभाव्य प्रभागांतील उमेदवार मुलाखतीस उपस्थित होते. या उमेदवारांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते उच्चशिक्षित कार्यकर्त्यांचा समावेश होता.

मुलाखतीस उपस्थित उमेदवारांमध्ये कॉ. नलिनीताई कलबुर्गी, कॉ. नसीमा शेख, कॉ. सुनंदाताई बल्ला, कॉ. अॅड. अनिल वासम, माजी नगरसेवक कॉ. व्यंकटेश कोंगारी, कॉ. अरुणा गेंटयाल, कॉ. अमित मंचले, कॉ. श्रीनिवास म्हेत्रे, कॉ. अनिता आडम, श्रीमती सुषमा सरवदे, कॉ.अकिल इस्माईल शेख, मंजू हलकट्टी कॉ. विजय हरसुरे, ॲड.मोहन कुरापाटी, श्री. शंकर गुंगेवाले, कॉ. किशोर झेंडेकर आदींचा समावेश होता.

या सर्व उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेत श्रमिक, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला.

यावेळी सर्व उमेदवारांनी आपल्या समर्थ कार्यकर्त्यांसह लाल उपरणी, लाल टोपी व लाल झेंडे हातात घेऊन पारंपरिक वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहाने पक्ष कार्यालय परिसर दणाणून सोडला. संपूर्ण परिसर लालमय वातावरणाने भारावून गेला.

Reactions

Post a Comment

0 Comments