निवडणूक कामात गैरहजर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई- आयुक्त डॉ. ओम्बासे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्याप नेमून दिलेल्या क्षेत्रीय अधिकारी तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे रूजू न झाल्याचे निदर्शनास आले आहे. सदर बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शक व सुरळीत अंमलबजावणीस अडथळा निर्माण करणारी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देत आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीसा दिल्या आहेत.
तसेच निवडणूक आचारसंहिता पालनासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून स्थिर देखरेख पथक व इतर निवडणूक कामांसाठी नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्यालयामार्फत तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून वेळोवेळी कर्तव्यावर हजर राहण्याबाबत सूचित करण्यात आले होते. तथापि, आदेश बजावून देखील काही अधिकारी व कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर हजर न राहिल्याचे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, सोलापूर महानगरपालिका डॉ. सचिन ओम्बासे (भा.प्र.से.) यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निवडणूक कामकाजात जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ अंतर्गत कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच, क्षेत्रीय अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे रूजू न झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उद्या सकाळी १०.०० वाजेपर्यंत कर्तव्यावर उपस्थित राहावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विहित वेळेत उपस्थित न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम ३४ नुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून, निवडणूक कामासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य जबाबदारीने, शिस्तबद्धपणे व वेळेत पार पाडावे. निवडणूक कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा आदेशांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

0 Comments