झेडपी निवडणुकीबाबत आ. कल्याणशेट्टींची ठाम भूमिका
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर की महायुतीतून लढायची, याबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ पक्षनेतृत्व घेणार असले तरी अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर आणि पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे स्पष्ट मत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
मंगळवारी (दि. २३) जिल्हा परिषदेत आले असता पत्रकारांशी संवाद साधताना आ. कल्याणशेट्टी म्हणाले की, तालुक्यातील निवडणुकांबाबत महायुतीचा कोणताही प्रश्न नाही. जिल्हा पातळीवर महायुती झाली, तरीही अक्कलकोट तालुक्यात झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावरच लढविल्या जातील. तशा स्पष्ट सूचना आपण वरिष्ठ नेत्यांना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, अक्कलकोट हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याचे नाव देश-विदेशात पोहोचावे, यासाठी तीर्थक्षेत्र आराखड्यातून व्यापक विकास केला जाणार आहे. यासाठी नव्या तीर्थक्षेत्र आराखड्याचे काम सुरू असून तो लवकरच पूर्ण होणार आहे.
गेल्या दीड वर्षांपासून जिल्हा परिषदेत येणे झाले नव्हते. त्यामुळे अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्ते, नागरिकांची अनेक कामे प्रलंबित राहिली आहेत. ही कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेत आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यात विविध विकासकामे सुरू असून त्यांचा आढावा घेण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना ही कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्याचेही आ. कल्याणशेट्टी यांनी यावेळी नमूद केले.
नव्या तीर्थक्षेत्र आराखड्यानुसार अक्कलकोटचा विकास,अक्कलकोट तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचावे, यासाठी नव्या तीर्थक्षेत्र आराखड्याची निर्मिती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिल्या आहेत. या नव्या आराखड्यानुसारच अक्कलकोट तीर्थक्षेत्राचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती आ. कल्याणशेट्टी यांनी दिली.

0 Comments