मोहोळचा विकास रोखणार नाही :- शिंदे–पवार
पोखरापूर (कटूसत्य वृत्त) :- मोहोळ नगर परिषदेत परिवर्तन घडवत अवघ्या २२ वर्षांच्या तरुण व सुशिक्षित सिद्धी वस्त्रे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाचा मान मिळवला आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद असून मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे ठोस आश्वासन राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी दिले.
मोहोळ नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला असून पक्षाचे इतर आठ नगरसेवकही विजयी झाले आहेत. शिवसेनेचे ओबीसी राज्य नेते रमेश बारसकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या समवेत नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
शिवसेनेच्या राज्यातील नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांचा ठाणे येथे मेळावा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहोळच्या नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे यांना व्यासपीठावर बोलावून त्यांचे विशेष कौतुक केले. शिंदे म्हणाले, “मी नगरविकास मंत्री असल्याने मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.”
दरम्यान, पुणे येथे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांनी भेट घेतली. यावेळी पवार म्हणाले, “मी राज्याचा अर्थमंत्री असल्याने मोहोळ शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात कोणतीही अडचण येणार नाही.”
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या शाश्वत आश्वासनामुळे मोहोळ शहराच्या विकासाला गती मिळणार असून प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

0 Comments