Hot Posts

6/recent/ticker-posts

राजू खरे यांची उपमुख्यमंत्र्यांना पत्र; महामार्गाचे मूळ आरेखन कायम ठेवावे

 राजू खरे यांची उपमुख्यमंत्र्यांना पत्र; महामार्गाचे मूळ आरेखन कायम ठेवावे




पंढरपूर (कटूसत्य वृत्त) :- प्रस्तावित नागपूर–गोवा शक्तीपीठ महामार्गाचे सोलापूर जिल्ह्यातील मोजणीचे काम जवळपास पूर्ण झाल्यानंतर या महामार्गाच्या आरेखनात कोणताही बदल करू नये, अशी मागणी मोहोळ मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. याबाबतचे लेखी निवेदनही त्यांनी सादर केले. त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित विभागाला तपासून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यातील १२ जिल्ह्यांमधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अनेक ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांनी या महामार्गाला समर्थन तसेच विरोध दर्शविला. भूसंपादन प्रक्रियेत अनेक ठिकाणी संयुक्त मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.

दरम्यान, विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरपासून या महामार्गाचे आरेखन बदलण्याची सूचना दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर आ. राजू खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेत, शेतकऱ्यांच्या चिंता व्यक्त केल्या.

शक्तीपीठ महामार्ग मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातून जात असून, सोलापूर जिल्ह्याचा हा भाग अति-दुष्काळी आहे. आ. खरे यांनी म्हटले की, वास्तविक पाहता या महामार्गासाठी जिल्ह्यात संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून आता आरेखन बदलल्यास बाधित शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होऊ शकतो आणि अनेक शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

आ. खरे यांनी मागणी केली की, आमच्या दुष्काळी भागाला न्याय मिळावा, महामार्ग आधी जाहीर झालेल्या आरेखनानुसार पूर्ण व्हावा आणि शेतकऱ्यांना मावेजा दिले जावेत. यानुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना तपास करून अहवाल सादर करण्याचे लेखी निर्देश दिले आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments